गुटखा खाणे साडेनऊ लाखात पडले!

0

पुणे : गुटखा खाण्याचे व्यसन एका सेल्समनला चांगलेच भोवले. मालकाचा फोन घेण्यासाठी गुटखा थुकण्याकरिता तो वाकताच दुचाकीवर ठेवलेली साडेनऊ लाख रूपये किंमतीच्या दागिन्याची बॅग चोरट्यांनी हातोहात लंपास केली. मंगळवार पेठेत ही घटना घडली. सुरेंद्र मेहता (वय 48,रा. भवानीपेठ) असे या सेल्समनचे नाव आहे. मेहता याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन जणांविरूद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती फरासखाना पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एम. पी. जाधव यांनी दिली.

फोटो दाखवून म्हणाले या मुलाला पाहिले का?
सुरेंद्र मेहता यांचा मेव्हणा अनिल मेहता यांचे रविवार पेठेत दुकान आहे. नाकात घालण्यात येणार्‍या सोन्याच्या चमक्यांची ते विक्री करतात. सुरेंद्र हा त्यांच्याकडे सेल्समन म्हणून काम करतो. सुरेंद्र याने नेहमीसारख्या दुकानातून सोन्याच्या चमक्या विक्रीसाठी घेतल्या. 9 लाख 60 हजार रूपये किमतीच्या 10 ते 12 कॅरेट सोन्याच्या चमक्या असलेली सॅक अ‍ॅक्टीव्हावर पायाजवळ ठेवून तो निघाला. नेहमीच्या ठरलेल्या दुकानात तो जाऊन आला. मंगळवार पेठ परिसरात असलेल्या सार्वजनिक रोडवर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तो आला त्यावेळी दोन भामट्यांनी त्याला एका मुलाचा फोटो दाखविला. या मुलाला तुम्ही कुठे पाहिले का? अशी विचारणा त्यांनी केली. मात्र, आपल्याला या परिसराची माहिती नसल्याचे उत्तर मेहता यांनी दिले. याचदरम्यान अनिल मेहता यांचा त्याला फोन आला. फोनवर बोलण्यासाठी तो गुटखा थुंकण्यासाठी वाकला. हीच संधी साधून चोरट्यांनी अ‍ॅक्टीव्हाच्या पुढे ठेवलेली सोन्याच्या चमक्या असलेली सॅक लांबविली. हा प्रकार लक्षात येताच सुरेंद्र याने आरडाओरडा केला मात्र, तेवढ्यात हे चोरटे पसार झाले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. असे उपनिरीक्षक एम. पी. जाधव यांनी सांगितले. मुलाचा फोटो दाखवून विचारणा करणार्‍या दोघांनीच ही चोरी केल्याचा संशय सुरेंद्र याने व्यक्त केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघे दिसत आहेत, अशी माहितीही पोलिस उपनिरीक्षक जाधव यांनी दिली.