गुटखा देण्यास नकार दिल्याने तरुणाला जाळले

0

मथुरा । गुटख्याचे पाकिट देण्यास नकार दिल्याने दोनजणांनी एका तरुणाला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणातील दोन्ही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे उत्तरप्रदेशात खळबळ उडाली आहे.

मथुरा जिल्ह्यातील सपोहा गावात ही घटना घडली. परदेसी हा तरुण गावातील दुकानात गुटखा खरेदीसाठी गेला होता. तिथे राजू आणि राहुल हे दोन तरुण पोहोचले. त्यांनी परदेसीकडे गुटख्याची मागणी केली. मात्र त्याने गुटखा देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या राहुल आणि राजूने परदेसीच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटवून दिले. त्यात परदेसीच्या कंबरेखालील 20 टक्के भाग जळाला आहे. गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ आग विझवली आणि त्याला मथुराच्या जिल्हा रुग्णालायात उपचारासाठी दाखल केले.

याप्रकरणी हायवे पोलिसांनी भादंविच्या कलम 307, 325, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलीस अधिकारी उदयवीर यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.