जामनेर । जामनेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून सुमारे पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त केला. मात्र, अंधाराचा फायदा घेवून संशयित पसार झाला. दोन लाख 63 हजार 300 रुपयांचा गुटखा तसेच चार लाख रुपये किंमतीची मारोती इको गाडी जप्त करून चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर तालुक्यातील करमाड येथील पाराचा चौक परिसरात (क्र.एम.एच.19 सीझेड 5768) या वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या तंबाखू व पानमसालाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळाल्याने त्यांनी संबंधित गावात 7 रोजी मध्यरात्री सापळा रचला. मध्यरात्री दोन वाजता वाहन येताच पथकाने वाहन अडविले. मात्र, त्याचवेळी लोडशेडींग सुरू असल्याने अंधाराचा फायदा घेत चालक पसार झाला. पोलिसांनी गुटखा जप्त करत वाहन पोलीस ठाण्यात आणले. चालकासह मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.