गुटखा बंदीच्या नियमाची सर्रास पायमल्ली!

0

रावेत : महाराष्ट्रात गुटखा, सुगंधित तंबाखू विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. मात्र, तरीही शहरातील रावेत, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी आदी भागात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. हप्ते द्या आणि दुकान, पानटपर्‍या किंवा अन्य कोठेही बिनधास्तपणे गुटखा विक्री करा, असा अलिखित फतवाच हप्तेखोरांनी काढला असल्याची परिस्थिती आहे. कर्करोगासारख्या घातक रोगांचे मूळ असलेली तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नका, असे आवाहन शासनाच्या आरोग्य विभागाकडून दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून सातत्याने केले जाते. परंतु, तरीही तंबाखू, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जाते. अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी बेकायदा गुटखा विक्री थांबवावी, अशी मागणी होत आहे.

पोलिसांची हप्ते वसुली जोरात
महाराष्ट्रात गुटखा, सुगंधित तंबाखू तसेच पानमसाल्याचे उत्पादन, वितरण, साठा व विक्री करण्यास अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नुसार बंदी घालण्यात आली आहे. गुटखा विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही शहरासह उपनगरात सर्वत्र खुलेआम चढ्या भावाने गुटखा विक्री सुरू आहे. रावेत आणि परिसरात तर गुटखा विक्रीचा घाऊक बाजार सुरू आहे. रावेत, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, गुरुद्वारा चौक परिसरात किराणा मालाची दुकाने आणि पान टपर्‍यांवर सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. विविध पोलीस ठाण्यांचे ‘कलेक्शन’ करणारे काही पोलीस कर्मचारी गुटखा विक्री करणार्‍यांना धमकावत त्यांच्याकडून मासिक हप्ते घेत आहेत. त्यामुळेच खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे.

जादा दराने विक्री
आकुर्डी स्टेशन परिसरात पानटपर्‍यांवर गुटखा विक्री सुरू असून, ग्राहकांकडून जादा रक्कम आकारली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांकडून गुटखा विक्रीवर कारवाईच होत नसल्याने विक्रेत्यांचे फावले आहे. बेकायदा गुटखा विक्रीवर कोणाचेच नियंत्रण नाही. गुटखा विक्रीमागे मोठे रॅकेट सक्रिय आहे. जेथे कुंपणच शेत खात आहे, तेथे कारवाई करायची कोणावर व करणार कोण, हा प्रश्‍न आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या गुटखा विक्री बंदीची सर्रास पायमल्ली होत आहे.

बंदीतही बिनधास्त विक्री
गुटखा बंदीच्या कालावधीत एखाद्या किरकोळ विक्रेत्याच्या दुकानावर धाडी टाकून अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस प्रशासन कारवाईचा फार्स करताना दिसून येत आहेत. कारण गेल्या वर्षभरात रावेत, वाल्हेकरवाडी परिसरात कुठेही गुटख्याचा साठा सापडला नाही की, विक्री करणारे सापडले नाहीत. बाजारात मोठ्या प्रमाणावर गुटखा उपलब्ध होऊन त्याची बिनधास्त विक्री कशी होते आहे? हा संशोधनाचा भाग झाला आहे.

विक्रेते व व्यापारी मोकाट
गुटख्याची चोरटी विक्री करणारे विक्रेते व त्यांना माल उपलब्ध करून देणारे व्यापारी मोकाट आहेत. दुकानातून अथवा पानपट्टीतून खुलेआम गुटखा विक्री केली जात नसली तरी नेहमीच्या ग्राहकाला त्रयस्थ ठिकाणी पाठवून किंवा बोलावून चोरून विक्री केली जाते. नवख्या ग्राहकाला संबंधित विक्रेते गुटखा मिळत नसल्याचे सांगतात. नेहमीच्या ग्राहकांना मात्र, हवा तेवढा गुटखा पुरविला जातो. गुटख्याच्या पुड्यांची विक्री मूळ दराच्या तिप्पट ते चौपट दराने केली जात आहे.

ठोस व कडक कारवाईची गरज
राज्यात गुटखा बंदी सुरूच ठेवण्याचा शासनाचा विचार स्तुत्य असला तरी अन्न व औषध प्रशासनासह पोलीस खात्यानेही गुटखा मिळणार्‍या ठिकाणांचा कसून शोध घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. गुटख्याचा पुरवठा करणार्‍या व्यापार्‍यांवर कडक व ठोस कारवाई करावी. असे केल्यानेच खर्‍या अर्थाने गुटखा बंदी होईल, असे मत सर्वसामान्य नागरिक, गृहिणी, सामाजिक तसेच व्यसनविरोधी संघटनांनी व्यक्त केले आहे.