गुटख्याची चोरटी वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई

 

शिरपूर। दोंडाईचाकडून धुळ्याकडे अवैध गुटखा जन्य पदार्थाची चोरटी वाहतूक करणार्‍या वाहनावर सोनगीर पोलिसांनी सोनगीर फाट्यावर बुधवारी रात्रीच्या सुमारास धडक कारवाई करत पाच लाख 29 हजार 848 रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य गुटखा ताब्यात घेत नऊ लाख 29 हजार 848 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी किशोर हिमतराव बाविस्कर अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषधी प्रशासन विभाग धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोनगीर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

सविस्तर असे, दोंडाईचाकडून धुळ्याकडे एका ईको गाडीतून अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना मंगळवारी मध्यरात्री मिळाल्याने त्यांनी पथकासह सोनगीर फाट्यावर सापळा रचला होता. गुरुवारी मध्यरात्री अडीच ते 3 वाजेच्या सुमारास इको गाडी (क्र. एमएच-21व्ही.2763) हिला थांबवून चौकशी करीत तपासणी केली. तेव्हा गाडीत महाराष्ट्र शासनाने विक्रि व आयात निर्यात व उत्पादनासाठी बंदी घातलेला पाच लाख 29 हजार 848 रुपये किमतीचा पानमसाला व तंबाखू अशा गुटखाजन्य पदार्थाची वाहतूक करताना आढळून आले.

 

दोघांना घेतले ताब्यात

सोनगीर पोलिसांनी गुटखाजन्य पदार्थ ताब्यात घेत चार लाख रुपये किंमतीची ईको गाडी असा नऊ लाख 29 हजार 848 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून चालक सहद अहमद इरफान अन्सारी (रा. गफुर नगर वडजई रोड धुळे) व त्यांचा साथीदार लतीफ बैजु मेहतर (रा. वय 29, रा. नटराज टॉकीजवळ, गल्ली नं 7, काझी अतिक्रमण वस्ती, धुळे) यांना ताब्यात घेतले. तपास पीएसआय नामदेव सहारे करीत आहेत.

 

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग साकीचे प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, पोना. संजय जाधव, पोना.अमरीश सानप, पोकॉ. विजयसिंग पाटील आदींनी केली आहे.