गुटख्याची तस्करी ; मुंदखेड्याच्या दोघांविरुद्ध गुन्हा

0

मुक्ताईनगर- गुटख्याची तस्करी करून मुक्ताईनगर पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जामनेर तालुक्यातील मुंदखेडा येथील रहिवासी व चारचाकी चालक नारायण जयसिंग पवार, मूलचंद रामदास राठोड (दोन्ही रा.मुंदखेडा, ता.जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या ताब्यातून सुमारे अडीच लाखांचा गुटखाही जप्त करण्यात आला. 13 एप्रिलला रात्री 9.30 वाजता संशयीत आरोपी बसस्थानक परीसरातील रेणुका नगरातून चारचाकी वाहनातून (क्रमांक एम.एच.19 सी.एफ.4599) ने गुटखा नेत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचला. डीवायएसपी संजय देशमुख, निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक उजगरे, हवालदार कांतीलाल केदारे, कल्पेश आमोदकर, नितीन चौधरी, देवसिंग तायडे यांनी आरोपींना अटक केली. संशयीतांनी हा गुटखा मुक्ताईनगर येथील वैभव नेमीचंद गलवाडे याच्याकडून विकत घेतल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी नारायण पवार, मूलचंद राठोड आणि वैभव गलवाडे या तिघांना अटक केली असून हवालदार कांतीलाल केदारे यांचे फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.