हैदराबाद । भारताची दिग्गंज बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा स्वत:ची बॅडमिटन अकॅडमी सुरू करणार आहे.याची घोषणा स्वत: ज्वाला गुट्टाने नुकतीच केली आहे. पुढील महिन्यात सुरू होणार ही अकॅडमी नॉक आऊट वेलनेस लॅब्स एएलपीच्या साथीने बनवण्यात आली आहे.यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक प्रशिक्षणाच्या सर्व सुविधा असणार आहे.
जागतिक पातळीवरील स्पर्धेच्या तयारीसाठी खेळाडूंना सर्वोत्तम प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ज्वाला गुट्टा पत्रकारांशी बोलतांना म्हणाली की, “भारतात बॅडमिंटनचा प्रसार वेगाने होत आहे आणि अनेक युवा खेळाडू याकडे कारकीर्दीच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने पाहत आहेत. ही अकॅडमी युवा खेळाडूंचा शोध, त्यांच्यातील गुणांना विकसित करण्यास साह्यकारक ठरेल, तसेच त्यांना सर्वोत्तम ट्रेनिंग दिले जाईल.” अकॅडमीतील प्रतिभावान खेळाडूंना परदेशात आदान-प्रदान कार्यक्रमांत पाठवले जाईल आणि आपल्या परिसरात राष्ट्रीय शिबिराचे यजमानपदही पत्करेल. या अकॅडमीत एक भारतीय आणि एक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक असेल.