पुणे – कोरोनामुळे अनेकांचे धाबे दणाणले असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य अवघ्या १४ दिवसांतच करोनामुक्त झाले आहे. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.
हे दाम्पत्य दुबईहून आले होते. त्यांची तपासणी केली असता, त्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्यांना ९ मार्च रोजी नायडू रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यांना विलगीकरण कक्षातही ठेवण्यात आले होते. गेल्या २४ तासात त्यांची दोनदा तपासणी करण्यात आली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.