गुड्डयाच्या खून प्रकरणातील दुसर्‍या आरोपीस अटक

0

धुळे । गुड्ड्या ऊर्फ रफियोद्दीन शफियोद्दीन शेख याच्या खून प्रकरणातील राजा भद्रा याच्या लहान भावाला शहर पोलिसांच्या पथकाने कासारे ता.साक्री येथून अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या संशयिताने गुड्ड्याच्या तोंडावर मिरचीची पुड टाकली असल्याचे सांगितले. आतापर्यंत या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या दोन झाली असून अन्य 9 आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

अभय देवरे गजाआड
मंगळवार 18 जुलैला रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याचा खून झाला होता. या प्रकरणी 11 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. विविध आठ पथकांच्या सहाय्याने फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. राजा भद्राचा लहान भाऊ अभय उर्फ दादू देवरे हा कासारे ता.साक्री येथे लपून बसला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल वडनेरे, उपनिरीक्षक नाना आखाडे, सहाय्यक उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, हवालदार मिलींद सोनवणे, मुख्तार मन्सुरी यांनी साक्री तालुक्यातील कासारे गावात सापळा रचून दादू देवरेला अटक केली. दरम्यान, या प्रकरणातील सागर पवार याला न्यायालयाने सहा दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठविले आहे. गुड्ड्या खून प्रकरणात आता सागर पवार व दादू देवरे असे दोन आरोपींची नावे असून पोलिसांच्या ताब्यात आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक एम.रामकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, गुन्हे अन्वेषण शाखेचे रमेशसिंह परदेशी यांचेही पथकं अन्य फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.