धुळे । रफिकोद्दीन शेख उर्फ गुड्ड्याचा शहरात 18 जूलै रोजी सकाळी सहाच्या सुमारास निर्घृण खून झाला होता. त्याच्या खुन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 18 आरोपींविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अनियम (मोक्का) 1999 अन्वये कारवाई करण्यात आली असून या अनुषंगाने वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांनी दिलेल्या परिपत्रकानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
सर्व आरोपी अटकेत
पोलिसांच्या सात पथकांनी 22 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत राज्यासह परराज्यातून ठिकठिकाणाहून प्रमुख 11 मारेकरी आणि त्यांना आश्रय देणार्या पाच आरोपींना अटक केली. ते सर्व न्यायालयीन कोठडीत असून आरोपी श्याम गोयर आणि विजय श्याम गोयर अद्याप फरार आहेत. हत्याकांड प्रकरणी आरोपी श्याम गोयर, विकी ऊर्फ विकास श्याम गोयर, विजय श्याम गोयर, विलास श्याम गोयर, सागर पवार ऊर्फ कट्टी, अभय ऊर्फ दादू देवरे, राजेश देवरे ऊर्फ भद्रा, भीमा देवरे, पारस घारू, गणेश बिवाल, योगेश जगताप, विकी चावरे, आबा भिका जगताप (रा. धुळे) हे खुनातील आरोपी असून त्यांना आश्रय देणारे आरोपी योगेश जयस्वाल (धुळे), प्रकाश मोरे (उल्हासनगर), महेंद्र खैरनार (कासारे, ता. साक्री), राकेश सोनार (नाशिक), लखन जेधे (संगमनेर, जि. नगर) यांचा ’मोक्का’ त समावेश आहे.
आरोपींच्या अडचणी वाढणार
गुड्ड्याच्या हत्याकांडातील गुन्ह्यात ‘मोक्का’ लागल्याने तपासाला 90 ऐवजी 180 दिवस मिळतील, तर चौदा दिवसांऐवजी 30 दिवसांची पोलिस कोठडी मारेकर्यांना मिळेल. मोक्का’च्या कारवाईतून दोषी व्यक्तीची सहजासहजी सुटका होत नाही. त्यामुळे 18 मारेकरी पुढील सात ते आठ वर्षे कारागृहात राहू शकतील. मोक्का’च्या निर्णयाची माहिती शहर पोलिस ठाण्यात नोंदवून जिल्हा न्यायालयाला दिली जाईल, असे अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी सांगितले.