धुळे । कुविख्यात गुंड रफियोद्दीन शफीयोद्दीन शेख उर्फ गुड्ड्याची धुळे शहरात धारदार शस्त्रासह पिस्तुलाने निर्घुन हत्त्या करण्यात आली. या प्रकरणाचा धुळे जिल्हा पोलीस डोळ्यात तेल घालून तपास करीत आहेत. गेल्या 24 तासात पोलिसांनी आपल्या नेटवर्कच्या आधारे 5 ठिकाणी पथके पाठवून तपासाला गती दिली आहे. धुळे शहरातील अनेक ठिकाणी पोलीसांनी झाडाझडती सुरूच ठेवली आहे. पोलीस अधिक्षक एम. रामकुमार यांच्या नेतृत्वाखाली डीवायएसपी हिंमतराव जाधव, एलसीबीचे रमेशसिंह परदेशी आपल्या सहकार्यांसह आरोपींना शोधण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींचे शहरासह इतर कुठल्या जिल्ह्यात गैर कनेक्शन होते याचा पोलीस शोध घेत आहेत. पुणे, नाशिक, जळगांव, अमळनेर आदी ठिकाणी पथके रवाना झाली होती. मात्र अद्याप त्यांच्या हाती गुन्हेगारांचा कुठलाही सुगावा लागलेला नाही. खुनातील आरोपींनी धुळे सोडतांनाच मोबाईल स्विचऑफ केल्यामुळे ते नेमके कुठे आहेत, याचे लोकेशन पोलिसांना अद्याप मिळाले नसल्याचे समजते.