अर्थमंत्री अरुण जेटली यांची पत्रकार परिषदेत माहिती
नवी दिल्ली : दिल्लीत आज झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत सिनेमाचं तिकीट, टीव्ही यासह अनेक वस्तूंवरील जीएसटी दरांत कपात केली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर केंद्र सरकारने सामान्यांना खास भेट दिली आहे. नवे जीएसटी दर १ जानेवारी २०१९ पासून लागू केले जाणार आहेत.
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदेची ३१वी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन जेटली यांनी निर्णयांची माहिती दिली. एकूण ३३ वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात २६ वस्तूंवरील जीएसटी दर आधीच्या १८ टक्क्यांवरून आता १२ किंवा ५ टक्के असा करण्यात आला आहे. २८ टक्के जीएसटीच्या कक्षेतील ६ वस्तू आता १८ टक्के जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत, असे जेटली यांनी सांगितले. टायर, व्हीसीआर आणि लिथियम बॅटरीवर आता २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. ३२ इंचाच्या टीव्हीवरही आता २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी घेतला जाईल, ३१ मार्च २०१९ पर्यंत जीएसटी रिटर्न भरल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही.असेही जेटली यांनी स्पष्ट केले.
२८ टक्क्यावरून १८ टक्क्यावर जीएसटी आलेल्या वस्तू
टायर
लिथियम बॅटरी
३२ इंचापर्यंतचा टीव्ही
१०० रुपयांवरचे सिनेमा तिकिट
बिलियर्ड्स आणि स्नूकर्स
जीएसटी १८ टक्क्यांपेक्षा कमी झालेल्या वस्तू
फूटवेअरवरचा जीएसटी १२ ते ५ टक्के असा करण्यात आला आहे
गोठवलेल्या भाज्या ५ टक्क्यांवरून ० टक्के
थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स १८ टक्क्यांवरून १२ टक्के
धार्मिक यात्रांवरचा जीएसटी १८ वरून १२ टक्के