दिलीप देशपांडे
सहिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुध्द प्रतिपदेला गुढी पाडवा हा सण आपण साजरा करतो. आपण साडेतीन मुहूर्त मानतो, त्यातील गुढीपाडवा हे एक मुहूर्त आहे. आपल्या दाराशी गुढी उभारणे हे विजयाचे तसेच समृद्धीचे प्रतीक समजले जाते. याच दिवशी अनेकजण नवीन व्यवसायाला प्रारंभ करतात. नवीन कार, फ्लॅट, घर अशा नानाविध वस्तूंची खरेदी करतात. जो तो आपापल्या ऐपतीप्रमाणे सोने खरेदी करतो. एक ग्रॅम का असेना, पण घेतात. त्या दिवशी ते महत्त्वाचे मानले गेले आहे. ते समृद्धीचे समजतात. गुढीपाडव्याचे दिवशी अनेक जण शुभ संकल्प करतात. ह्या दिवशी केलेले संकल्प फलदायी ठरतात.असा अनेकांना अनुभव आहे. गुढीपाडवा आपसातील वैरभाव, मतभेद, विसरून शांतता मिळवून देणारा आनंददायी असा सण आहे. नवसंवत्सराचा प्रारंभ होतो. नववर्षाचा हा पहिला दिवस महत्वाचा तसेच पवित्र समजला जातो. ह्याच दिवशी नवीन वर्षाचे पंचांग आणून त्याचेही पूजन केले जाते. अनेक शहरात, गावात, पहाटेच भक्तिसंगिताचे पाडवा पहाट सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात आणि नववर्षाचे स्वागत केले जाते. आनंददायी सुरुवात केली जाते. नवीन वर्षाचे स्वागतासाठी दारासमोर गुढी उभारली जाते. गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. सकाळी मंगल स्नानादी उरकून, नवीन वस्त्र परिधान करुन, बांबूच्या काठीला पिवळ्या किंवा भगव्या-केशरी रंगाचे वस्त्र नेसवून, गुंडाळून, तांब्याच्या किंवा चांदीचा कलश उलटा ठेवतात. त्याला गंध लावून कडूनिंबाचे पानाचा घोस लावतात. साखरेचा गाठीचा हार, फुलांचा हार घालतात. हळदीकुंकवाने पूजा केली जाते. निरांजन, उदबत्ती ओवाळतात. पेढ्याचा नेवैद्य दाखवतात. मंगल वाद्यावर वादन केले जाते आणि नववर्ष सुखसमृद्धीचे, आनंदाने जावे म्हणून मनोभावे प्रार्थना केली जाते. गुढी दाराशीच उजव्या बाजूला, तशीच खिडकीमध्ये, गच्चीवरही उभारली जाते. दाराशी सडा टाकून सुंदर रांगोळ्या काढतात. घराच्या मुख्य दरवाज्यावर आंब्याची पाने, झेंडुच्या फुलांचे तोरण लावतात. पूजेनंतर कडूनिंबाची पाने आणि गुळ यांचे मिश्रण सेवन करतात. येणारे वर्ष आरोग्यदायी जावो, उन्हाळा त्रासदायक ठरु नये हीच त्यामागील भावना असते. बहुसंख्य कुटुंबात गुढीपाडव्याला श्रीखंड-पुरीचाच बेत जेवणात असतो.
प्रभू श्रीरामचंद्राचे विजयाचे प्रतीक, रावणावरच्या विजयाचे कौतुक, असा हा आनंददायी सण.
विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी…
प्रभु आले मंदिरी….
गुलाल उधळूनी नगर रंगले…
भक्त जनांचे थवे नाचले…
राम भक्तिचा गंध दरवळे …
गुढ्या तोरणे,घरोघरी..गं.घरोघरी.।
प्रभु आले मंदिरी,…
अयोध्येचा आला राजा…
या गाण्यात त्याच खूप छान वर्णन केले आहे.
रावणाच्या त्रासातून मुक्त झाल्याने व श्रीरामाचे आगमन झाल्याने नगरवासीय आनंदित झाले आहेत. त्यांनी गुढ्या उभारल्या, तोरणांनी घरे सजविले. गुढीपाडव्याचे दिवशी घरोघरी हे गाणे ऐकायला मिळत. संध्याकाळी परत गुढीची पूजा करुन गुढी उतरवण्याची प्रथा आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा आपल्यावर पाश्चात्यांचा पगडा कायम आहे. 1 जानेवारीलाच नववर्ष साजरा करण्याचा पायंडा पडला आहे. 31 डिसेंबरला मद्यधुंद अवस्थेत सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि त्याच अवस्थेत नववर्षाच्या स्वागत करायचे, फटाके फोडायचे. बघा काय विचित्र आणि हिडीस प्रकार सुरु आहे. मग अनेक प्रकार घडतात. अपघात, मारामार्या, बलात्कार, विनयभंग, संस्कृतीचे अधःपतन सुरु आहे. कोण थोपवणार हे सगळं? ज्यांनी काहीतरी करायला हव, ते बसतात मुग गिळून गुपचूप. सरकारी तिजोरीत मात्र खूप सारा पैसा जमा होतो. निरनिराळ्या वृत्तपत्रांतून दारुविक्रीचा उच्चांक जाहीर होतो. एक विचार मनात येतो, 28 डिसेंबर ते 4-5 जानेवारी पर्यंत शासनाने दारूबंदी करावी, बघा कोण नववर्ष साजर करतो? (नव्वद टक्के लोकांचे हे नववर्ष केवळ आणि केवळ मद्य प्राशनासाठी साजर करणे असते हे सांगायला नकोच.) काय साध्य होतय यातून? बघूया सरकार असा निर्णय घेणार का? एका चांगल्या कामाची मुहूर्तमेढ सरकार कडून होणार का? सत्ययुगाचा आरंभ म्हणजे गुढीपाडवा, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. प्रभूश्रीरामाचे आगमनाचा दिवस गुढीपाडवा. आध्यात्मिक दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि ते योग्यच आहे. पाश्चात्त्यांचे करत असलेले अंधानुकरण रोखण्यासाठी आपण सर्वानीच पुढाकार घ्यायला हवा. गुढीपाडव्याला मांगल्याची गुढी उभारून, नववर्षाचे स्वागत करुन, एकमेकांना नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा देऊन आपला मराठी बाणा जपूया. आपल्या देशावर आलेल्या कोरोनासारख्या संकटातून मुक्तीसाठी प्रार्थना आपण सर्वच जण करु या.