गुढीपाडव्यासाठी बाजार सजला

0

डोंबिवली (श्रुति देशपांडे) : हिंदु नववर्ष प्रारंभ तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक सजमला जाणारा गुढीपाडवा अवघ्या एका दिवसावर येवून ठेपला आहे. त्यामुळेच पाडव्याची तयारी करण्यासाठी महिला वर्गाने बाजारात रविवारी गर्दी केली. साखरेच्या गाठी, कडूलिंबाचा पाला, वस्त्र, फुले घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोन्याचे दागिने आणि वाहनांच्या दुकानांतही अनेक विशेष खरेदी सवलतींचे फलक झळकत होते. आजजरी अनेक लोक नोटबंदीचा फटका बसल्याचे सांगत असले तरी पाडव्याच्या खरेदीवर मात्र याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नव्हते.

मंगळवारी गुढीपाडवा सण साजरा होणार आहे. जरी एक दिवस राहिला असला तरी नोकरदार वर्गासाठी हा शेवटचा रविवार असल्याने रविवारी सायंकाळी भरपूर लोक खरेदीसाठी बाहेर पडले होते. गुढीपाडव्या दिवशी सर्व लोक गुढीला कडुलिंबाचे डहाळे, फुलांचा हार, साखरेच्या रंगीत गाठी घराबाहेर झेंडू व आंब्याच्या पानांचे तोरण लावतात हे सर्व जरी लगेच कोमेजणार्‍या गोष्टी असली तरी लोकांना सोमवारी ऑफीस असल्याने या सर्व गोष्टी रविवारी घेणेच पसंत केले. तसेच गुढीपाडव्याच्या नैवेद्यासाठी भरपूर ठिकाणी श्रीखंड-पुरीचा बेत केला जातो. यासाठीही अनेकांनी चक्का घेऊन घरी श्रीखंड करणे पसंत केले जाते. त्यासाठी एक दिवस अगोदरपासुनच चक्का घेऊन त्यात आधीपासून साखर घालण्यात येते तर अनेकजण त्याच दिवशी रेडिमेड श्रीखंड, आम्रखंड घेतात. तर या दिवशी अनेक जण आंबा कितीही महाग असला तरी आमरसाचा नैवेद्य दाखवतात. शेवटी हौसेला मोल नसते.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही भरपूर ऑफर्स
उन्हाळा आला की नागरिकांना गारवा देणार्‍या वस्तूंची गरज लागते. एसी, कुलर आणि वेगवेगळ्या आकार आणि प्रकाराचे पंखे यांना मागणी वाढते. सुखद गारवा देणार्‍या वस्तूंबरोबरच खरेदीदार नवा टीव्ही, रेफ्रिजरेटर, संगणक, लॅपटॉप तसेच उंची मोबाईलच्या खरेदीवर जास्त भर देण्याची शक्यता आहे. दुकानदारांनीही गुढीपाडवा स्पेशल म्हणून बर्‍याच ऑफर्स लावल्या आहेत.

दागिन्यांचीही मोठी उलाढाल होणार
आपल्याला जमेल तितके सोने घ्या. मात्र मुहूर्त चुकवू नका, असे सांगणार्‍या व्यक्ती भेटतात. यामुळे खरेदीच्या मुहूर्तावर अगदी एक ग्रॅमपासून सोने खरेदी करणारे दिसून येतात. हौस-मौज म्हणून किंवा गुंतवणूक म्हणून, लग्नसराई म्हणून दागिने खरेदी करणारेही गुढीपाडवा हा दिवस महत्त्वाचा मानतात. यामुळे मंगळवारी शहर आणि परिसरातील सराफी पेढ्यांमध्ये मोठी गर्दी आणि उलाढाल होणार आहे.

मागील पाच ते सहा वर्षांत सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र दागिने खरेदी करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आपल्याला परवडेल तितक्या किमतीचे दागिने मुहूर्तावर खरेदी करण्याची परंपरा बेळगावकर जपत आले आहेत. शिवाय बेळगावच्या सराफांवर दर्जा आणि विश्‍वासाच्या बाबतीत बाहेरील मंडळीही खुष असल्याने त्यांचीही गर्दी असते.

वाहन बाजारात आगाऊ बुकींग
शहर आणि परिसरातील दुचाकी आणि चार चाकी वाहनांची विक्री करणार्‍या विविध कंपन्यांच्या शोरुम्समध्ये आगाऊ बुकींग झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सणाच्या निमित्ताने आवडते वाहन आणण्यास जावे आणि ते न मिळाल्याने विरस व्हावा, असे प्रसंग टाळण्यासाठी वाहन खरेदीदारांनी आगाऊ बुकींगचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. सध्या पेट्रोलचे दरही सर्वसामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे ठरत आहेत. अशा स्थितीत अधिक मायलेज देणारी दुचाकी खरेदी करण्याकडे ओढा अधिक आहे. दरम्यान, काही शोरुम्सनी मात्र आवश्यकतेपेक्षा थोडी जास्त वाहने मागवून कोणाचीही निराशा होऊ नये, याची खबरदारी घेतली आहे.

फुले ही महागली
उन्हाळा वाढल्याने फुलांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे फुल बाजारात फुलांची आवक घटली असल्याचे फुल विक्रेते तुकाराम पाटील यांनी सांगितले. परिणामी फुलांच्या किंमतही वाढल्या आहेत. 30रुपयाला एक झेंडूचे तोरण विकले जात आहे. तर 40 रुपये पाव किलो दराने झेंडू विकला जात होता.