गुढे गावात धाडसी चोरी : 50 हजारांचा ऐवज लंपास

भडगाव : तालुक्यातील गुढे येथे मध्यरात्री बंद घरातून 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांसाठी संधी
संदीप भानुदास पाटील (31, रा.गुढे, ता.भडगाव) हे शिक्षक असून आपल्या कुटुंबीयांसह राहतात. गुरुवार, 4 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता ते कुटुंबीयांसह जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरात घुसून घरात ठेवलेली पाच हजारांची रोकड, 25 हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगल पोत आणि 20 हजार रुपये किंमतीचा चांदीचा देवाचा मुकूट आणि बासरी असा एकूण 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल कपाटातून चोरून नेला. हा प्रकार शुक्रवार, 5 नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजता उघडकीला आला. या प्रकरणी संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक निलेश ब्राह्मणकर करीत आहे.