पिंपरी-चिंचवड : भोजपुरी चित्रपट म्हणजे अश्लीलता ही ओळख आता आम्ही पुसून काढत आहोत. अनेक गुणवत्तापूर्ण चित्रपटाद्वारे नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना भोजपुरीसह इतर भाषिक प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळत असल्याचा आनंद वाटतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध भोजपुरी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक प्रेम राय यांनी केले. त्यांनी शुक्रवारी दैनिक जनशक्तिच्या आकुर्डी येथील मुख्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. मुख्य संपादक कुंदन ढाके, व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी, निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे, सरव्यवस्थापक हणुमंत बनकर, जाहिरात व्यवस्थापक अमित शिंदे, वरिष्ठ उपसंपादक श्याम सोनवणे यांची याप्रसंगी उपस्थिती होती. यावेळी त्यांनी संपादकीय विभागाशी दिलखुलास बातचितही केली. तसेच, आगामी ‘आतंकवादी’ या चित्रपटाविषयी माहितीदेखील दिली. भोजपुरी सिनेमाने कात टाकली असून, बारा देश आणि उत्तर भारतासह महाराष्ट्रातदेखील या चित्रपटांना प्रेक्षकांची मोठी पसंती लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
भोजपुरीने देशाच्या सीमा ओलांडल्या!
‘लो बजेट’ म्हणजे कमी खर्चात भोजपुरी चित्रपट बनत होते; आणि त्यातून चांगले पैसे कमाविण्याचे प्रयत्न तत्कालीन निर्माते, दिग्दर्शकांकडून होत होते. परिणामी, खपते ते दाखवावे लागत होते. त्याचा परिणाम असा झाला की, भोजपुरी चित्रपट म्हणजे अश्लीलता अशी ओळख सर्वदूर निर्माण झाली. एक ‘मिथिला मखान’ हा चित्रपट सोडला तर एकाही चित्रपटाला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही. ही ओळख मोडून काढण्यासाठी व्यावसायिक नफा-तोटा यांचा विचार न करता आम्ही दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करत आहोत, असे सांगून प्रेम राय म्हणाले, की गेल्या काही वर्षांत पाच भोजपुरी चित्रपट तयार केलेत. हे सर्व चित्रपट सुपरहिट झाले आहेत. त्यातील गाणी प्रेक्षकांना आवडली आहेत. बिहारच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात, मुंबई आणि महाराष्ट्राच्या काही भागात अगदी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्येही हे चित्रपट आवडीने पाहिले गेलेत. या चित्रपटांत कुठेही अश्लीलता नव्हती, द्वीअर्थी संवाद नव्हते की भडक, उत्तेजक दृश्यांचा भडिमार नव्हता. चांगली गाणी, कथानक आणि तंत्रज्ञान व चित्रीकरणावर लक्ष केंद्रित करून चित्रपट बनवले तर ते लोकांना आवडतात. असे चित्रपटही सुपरहिट होतात हे आम्ही इतरांना दाखवून दिले आहे, असेही राय यांनी सांगितले.
‘आतंकवादी’ला राष्ट्रीय पुरस्कार नक्की मिळेल!
भोजपुुरी चित्रपटाचा एक काळ असा होता की हे चित्रपट सहकुटुंब पाहात येत नव्हते, इतकी अश्लीलता त्यात भरलेली होती. आता गेल्या चार-पाच वर्षांत हा ट्रेंड बदलला आहे. अर्थात, अश्लीलता हिंदी किंवा मराठी चित्रपटांतही असतेच; परंतु त्याला काही मर्यादा ठेवावी लागते. भोजपुरी चित्रपटांची निर्मिती करताना अर्थातच ही मर्यादा आम्ही पाळली. त्यामुळे प्रेक्षक कोणतेही भाषिक असोत, ते सहकुटुंब भोजपुरी चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविण्यासाठी भोजपुरी ही सूचिबद्ध भाषा नसल्याने अडचणी येतात. दर्जेदार निर्मिती करूनही या चित्रपटांसाठी मानांकन भरता येत नाही, अशी खंतही राय यांनी बोलून दाखवली. आता भोजपुरी अभिनेते व खासदार मनोज तिवारी यांनी भोजपुरी ही भाषा सूचिबद्ध करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्याला नक्कीच यश येईल, असा विश्वासही राय यांनी बोलून दाखवला. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ‘आतंकवादी’ या चित्रपटाला नक्कीच राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, असा विश्वासही राय यांनी बोलून दाखवला.
‘आतंकवादी’ चित्रपटासाठी ‘जनशक्ति’ मीडिया पार्टनर!
इंटरनेटवर चित्रपटाचा अन-सेन्सार भाग, गाणी प्रसारित होतात. तसेच, पायरसीमुळे सर्वच भाषेतील चित्रपटांना ग्रहण लागलेले आहे. त्यामुळे व्यवसायालादेखील फटका बसत असून, पायरसी रोखण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना होण्याची गरज आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करताना फारसा नफा हाती येत नाही. परंतु, भोजपुरीची ओळख बदलविण्यासाठी हा व्यावसायिक धोका आपण पत्कारत आहोत, असेही प्रेम राय यांनी सांगितले. सदिच्छा भेटीप्रसंगी ‘जनशक्ति‘चे मुख्य संपादक तथा सिद्धिविनायक उद्योग समूहाचे अध्यक्ष कुंदन ढाके यांनी प्रेम राय यांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले. राय यांच्या आगामी ‘आतंकवादी’ या चित्रपटासाठी दैनिक जनशक्ति हे मीडिया पार्टनर राहणार आहे. चुकून दहशतवादी झालेला तरुण पुन्हा मुख्य प्रवाहात येतो, असे थरारक चित्रण या चित्रपटात झालेले आहे. थ्रील, रोमान्स, देशप्रेम, उत्कृष्ट कथानक, सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट आणि मुख्य म्हणजे सुपरहिट गाणी याबाबी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू राहणार आहेत.