सोमेश्वरनगर । केंद्रभेट हा उपक्रम मार्गदर्शनपर असून त्यातून कोणत्याही शिक्षकावर कारवाई करण्यात येणार नाही. शिक्षणातील गुणवत्ता वाढीच्या उपक्रमांना शिक्षक संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला केले.
पुणे जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष नंदकुमार होळकर यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे सुरू केलेल्या केंद्रभेट उपक्रमांबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. समितीच्या शिष्टमंडळाने सांगितले की, केंद्रभेट हा उपक्रम चांगला आहे. परंतु, अंमलबजावणी करताना या भेटीदरम्यान केंद्रातील शिक्षकांना अधिकार्यांकडून नाहक त्रास देण्यात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तशा सूचना संबंधितांना देण्यात याव्यात. भेटीप्रसंगी अधिकार्यांना काय अपेक्षित आहे याची माहिती शाळा व शिक्षकांना अगोदर देण्यात यावी, भेट देणारे पथक हे मार्गदर्शकाची भुमिका घेणारे असावे, शिक्षकांच्या चूका काढून त्यांचे खच्चीकरण टाळावे, सापडलेल्या त्रूटीवर कशा उपाययोजना राबवाव्यात यावर मार्गदर्शन भेटी दरम्यानच करावे. शक्यतो महिला शिक्षकांच्या शाळांवर महिला अधिकारी भेट देण्यास जातील, असे नियोजन करावे. त्याबरोबरच हा उपक्रम राबवताना बाहेरील अधिकार्यांचे पथक तयार न करता त्या-त्या केंद्रातील केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांनाच दररोज एक शाळा तपासून अहवाल देण्यास सांगावा. शिष्टमंडळामार्फत या मागण्यांचे लेखी निवेदनही दराडे यांना देण्यात आले.
यावेळी शिक्षण समितीच्यावतीने दराडे यांचा सत्कार करण्यात आला. या शिष्टमंडळात आबा शिंपी, श्रीकृष्ण उत्पात, संतोष राक्षे, सुनिल कुंजीर, सुनिल लोणकर, शहाजी नाईक, विलास गायकवाड, विश्वनाथ कौले आदींसह अनेक पदाधिकार्यांचा समावेश होता.