गुणवत्तेसाठी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार

0

भुसावळ। गेल्या काही वर्षांपासून शालेय शिक्षण विभागात अनेक नाविन्यपूर्ण बाबींमुळे विद्यार्थी, शिक्षक व शाळा यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडत आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात गुणवत्तेसाठी केलेल्या प्रयत्नांना पुढेही सातत्याने सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन जळगाव डिआईसीपीडीचे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.चंद्रकांत साळुंखे यांनी येथे केले. जळगाव जिल्हा सातत्यपूर्ण शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्थेतील डॉ. साळुंखे यांची नाशिक येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरण येथे बदली झाल्यानंतर त्यांचा भुसावळ येथील शिक्षकांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी जळगावचे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. डी.बी. साळुंखे, नंदूरबारचे जेष्ठ अधिव्याख्याता प्रा. अनिल झोपे, संत गाडगेबाबा हायस्कूलचे पर्यवेक्षक प्रमोद आठवले उपस्थित होते.

नऊपैकी आठ शाळा केल्या प्रगत व डिजीटल
यावेळी द.शि. विद्यालयातील उपशिक्षक डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून डॉ.साळुंखे यांनी जळगाव जिल्ह्यात गुणवत्तेसाठी आग्रह धरला होता. शाळाभेटीच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन, गणित संबोध विकसन कार्यशाळेतर्ंगत जिल्ह्यात 52 वर्गांचे आयोजन व त्या माध्यमातून दोन हजार शिक्षकांना गणित संबोधांचे आकलन, शालेय नेतृत्व विकास प्रशिक्षणाच्या राज्य स्तरावरील कोअर कमिटीत काम, विभागीय प्रशिक्षणांना प्रशिक्षक, सामनेर केंद्र दत्तक घेवून तेथील नऊपैकी आठ शाळा प्रगत व डिजीटल केल्या.

सहकार्याचा घेतला आढावा
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण परिषदांना मार्गदर्शक, अधिकार्यांसाठी शैक्षणिक नेतृत्व घटक संच विकसनमध्ये राज्यावर काम, न्यूपा दिल्ली मार्फत पुढील शैक्षणिक वर्षांसाठी करावयाच्या एसएलडिपी नियोजनात सहभाग, ब्रिटीश कौन्सिल प्रशिक्षण वर्गांचे समन्वयक म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट काम केले असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. डॉ. डी.बी. साळुंखे व प्रा. अनिल झोपे यांनी डॉ. चंद्रकांत साळुंखे यांच्या तीन वर्षीय सहकार्याचा आढावा घेवून त्यांच्या कामाचे कौतुक केले. पर्यवेक्षक प्रमोद आठवले म्हणाले की, कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित न राहता प्रत्येक मूलापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे हा आग्रह प्रगतीसाठी लाभदायी आहे. हाच आग्रह डॉ.साळुंखे यांनी धरल्याने ही बाब जळगाव जिल्ह्यातील शाळा व शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली. सूत्रसंचालन दीपक आमोदकर यांनी तर आभार दीपक महाजन यांनी मानले.