गुन्हेगारांना पोलिसांनी अटक करून कारवाई करावी – आ.आझमी

0

नंदुरबार। जातीयवादी संघटना सक्रिय झाल्याने दंगली वाढू लागल्या आहेत. या दंगलीतील खर्‍या गुन्हेगारांना पोलिसांनी अटक करून कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आाझमी यांनी नंदुरबार येथे पत्रकारांशी बोलतांना केली.नंदुरबार येथे झालेल्या दंगलग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी व मयत शब्बीर पिंजारी यांच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी आ. आझमी हे काल नंदुरबार येथे आले होते.

यावेळी त्यांनी शास्त्री मार्केट भागात पहाणी करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, नंदुरबार येथे झालेल्या घटनेत पिंजारी यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी बाब आहे. या घटनेनंतर भावनांचा उद्रेक झाला. त्यात 4 तरूणांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या रमजानचा महिना सुरु असल्याने या तरुणांच्या सुटकेसाठी तसेच दंगलीत नुकसान झालेल्या कुटूंबियांच्या आर्थिक मदतीसाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. पोलिसांनी समान गुन्हेगारी आकड्यानुसार कारवाई न करता, खर्या गुन्हेगारांना अटक केली पाहिजे. राज्यात जातीयवादी संघटना सक्रिय झाल्या आहेत, यामुळे किरकोळ कारणांवरून जातीयतेढ निर्माण होवून दंगली सारखा प्रकार घडू लागला आहे. हिंदु मुस्लिम नागरिकांनी जातीय सलोखा ठेवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.