गेल्या आठवड्यात ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’ने ‘क्राइम इन इंडिया 2016’ हा अहवाल प्रसिद्ध केला. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षीचे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून ही चिंताजनक गोष्ट आहे. आपल्याकडे गुन्ह्यांची आकडेवारी गोळा करून त्याचा आढावा मांडला जातो, कारणमीमांसा केली जाते. मात्र समस्यांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न होत नाही. त्यामुळे उपाययोजना काढण्याच्या दिशेने पाऊलच टाकले जात नाही. गुन्हेगारीचा आलेख चढता राहिल्यास देशाची सर्वाधिक अधोगती होते. हे टाळण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठीच प्रयत्न होणे आवश्यक आहे.या अहवालानुसार सोशल मीडियावरून महिलांना त्रास देण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. यासह खंडणीसाठी ब्लॅकमेल करण्यासंदर्भातील गुन्ह्यांचीही नोंद आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये पैसे मिळवण्याच्या हेतूने सर्वाधिक गुन्हे घडले आहेत, तर राजकीय हेतूने प्रेरित 40 गुन्ह्यांची नोंद आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकाही राज्यकर्त्याने जनतेला धर्मशिक्षण दिले नाही. त्यामुळे समाज हळूहळू नैतिकतेच्या रसातळाला जात आहे.
महिलांसंदर्भातील गुन्ह्यांत वाढ होणे, हा त्याचाच दुष्परिणाम आहे. राजकारण हा जनतेची सेवा करण्याचा मार्ग आहे, ही संकल्पना लोप पावत चालली असल्याने त्यात गुन्हेगारीचा शिरकाव झाला आहे. राजकारण म्हणजे पैसे कमवण्याचा व्यवसाय, असे अयोग्य समीकरण सध्या निर्माण झाले आहे. बहुतांश राजकीय नेते पैशांच्या लालसेनेच या क्षेत्रात प्रवेश करतात आणि स्वत:च्या स्वार्थापोटी अवैध कृत्ये करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. त्यामुळे भ्रष्ट राज्यकर्त्यांमुळे जनतेतही आता पैसे कमवण्यासाठी गुन्हेगारी मार्ग अवलंबण्याची वृत्ती वाढीस लागली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शासन डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देते; मात्र सायबर गुन्ह्यांपासून स्वत:चा बचाव कसा करायचा?, याचे प्रशिक्षण देत नाही. त्यामुळे कित्येक नागरिक फसवणुकीला बळी पडतात.गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाणही कमी असल्याचे या अहवालातून उघड झालेली गंभीर समस्या आहे. संथगतीने चालणारी न्यायालयीन यंत्रणा, पोलीस प्रशासनाचा बेजबाबदारपणा, कायद्यातील पळवाटा, राजकीय दबाव यामुळे गुन्हेगारांना मोकळीक मिळते.
कठोर शिक्षा होत नसल्याने त्यांना कायद्याचा धाकही वाटत नाही. गुंडांची दहशत इतकी आहे की, त्यांच्याविरुद्ध साक्ष द्यायला कोणीच पुढे येत नाही. कारागृहात शिक्षा भोगूनही काही गुन्हेगारांमधील गुन्हेगारी वृत्ती बदलत नाही. यावरूनच भारतातील गुन्हेगारांना देण्याची शिक्षा पद्धत आणि त्याची मर्यादा लक्षात येतात. पाश्चिमात्य जीवनशैलीमुळे नीतीमूल्यांचा र्हास होत आहे. झटपट पैसे देणार्या चंगळवादी जीवनशैलीकडील ओढा वाढत आहे. हे सर्व बदलण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी कैद्यांमध्ये आमूलाग्र बदल होऊन त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होऊन ते सज्जनतेच्या मार्गावरून वाटचाल करतील, अशी समाजव्यवस्था आणि कायदेव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
– जयवंत हाबळे
वरिष्ठ उपसंपादक जनशक्ति, मुंबई
8691929797