(किशोर पाटील, उपसंपादक, जळगाव)
शहवासियांना चोरीच्या घटना नवीन नाहीत. भरदिवसा चोरी तसेच खुद्द पोलीस कर्मचार्यांकडेच चोरी, पर्स, मोबाईल लांबविण्यासारखे प्रकार विशेष म्हणजे शस्त्र प्रदर्शनातून पोलिसांच्या ताब्यातून पिस्तूल चोरीस गेले, यामुळे पोलीस सुरक्षित नसल्याने जनसामान्यांच्या सुरक्षेचे काय हा प्रश्न ‘आ’वासून उभा आहे. या सर्व प्रकारांमुळे शहरासह जिल्ह्याच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. यातच रंगेल पार्टीतील कारवाईप्रकरणी पोलिसांच्या संशयास्पद भुमिकेमुळे पोलीस दलाची उरली सुरली अब्रुही चव्हाट्यावर आली आहे. चोर्यांपर्यंत ठीक होते, वाढत्या चोर्या, गोळीबारासह भरदिवसा हल्लयाच्या, मारहाणीच्या घटनांमुळे गुन्हेगारीच्या बाबतीत जळगावची बिहारकडे वाटचाल होत असल्याची खेदजनक बाब आहे.
पूर्वी काळात पोलीस म्हटला की नागरिकांना नाव एैकताच घाम फुटायचा. खाकी वर्दीचा दरारा होता. गुन्हा च काय पण भांडण करतानाही लोक 100 वेळा विचार करायचे. त्याला त्याकाळचे दबंग अधिकारी व प्रशासनही कारणीभूत होतेच. मात्र आता नागरिकांना पोलिसांपेक्षा गुन्ह्ेगारांची जास्त भिती वाटायला लागली आहे. एक दिवसाआड भर दिवसांच्या चोर्यांमुळे चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे.
नागरिकांच्या घरी मात्र पोलीस अधिकार्यांच्या घरी, कर्मचार्यांच्या हातून मोबाईल, पर्स सारख्या गोष्टी लांबविणार्या चोरट्यांच्या तर हिमतीला दादच द्यावी लागेल. आता सांगा ज्या शहरात जिल्ह्यात पोलीसच सुरक्षित नाहीतर नागरिक सुरक्षित कसे? आपसातील राजकारण असो की इतर काही मात्र शस्त्र प्रदर्शनातून 10 ते 20 पोलिसांच्या ताब्यातून (समोरुन) भरदिवसा पिस्तूल चोरीस जाणे या घटनेमुळे तर पोलिस अधिकार्यांवर ‘चिल्लू भर पाणी डुब के’ या म्हणीप्रमाणे मरण्याची वेळ आणली आहे. विशेष म्हणजे कणखर अधिकारी असतानाही घटनेला चार दिवस उलटूनही त्याचा शोध लागलेला नाही. अशा कारभाराला कोणती पोलिसिंग म्हणावे, हा संशोधनाचा विषय आहे.
किती दिवस पोलीस अधीक्षक व डीवायएसी किंवा प्रभारी अधिकार्यांना यांना आपण ‘नया है वह’ असे म्हणत रहायचे… जिल्ह्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या अवैधधंद्यावर धडक कारवाई करणारे व शिस्तीचे भोक्ते असलेले पोलीस अधीक्षकांना रंगेल पार्टी प्रकरणात आपली दबंगगिरी का लपविली. कुठे गेला तो कणखरपणा? याप्रकरणामुळे ना भूतो…एवढी जिल्हा पोलीस दलाची नाचक्की झाली. नागरिकांनाच काय पण पोलीस कर्मचार्यांनाही यामुळे समजले की, वरिष्ठ अधिकारीच (कुणीही वैयक्तिक घेवू नये) धुतल्या तांदळाचे नसतील तर…आपण का प्रामाणिकपणा दाखवावा… एक डोळा बंद व एक डोळा उघडा ठेवून वरिष्ठ जर काम करत असतील का म्हणून मी एकट्याने गुंडगिरी कमी करण्यासाठी, नियंत्रण मिळविण्यासाठी काम करावे, असे प्रत्येक कर्मचार्याला वाटत असेल तर त्यात नवल काय? अधीक्षकांनी विशेष दबदबा असलेल्या कर्मचार्यांना (अधीक्षकांच्या भाषेत गैरवर्तन करणारे) शिस्त लावण्यासाठी नवचैतन्यतंर्गत प्रशिक्षण दिले. मात्र महिनाभराच्या कोर्स संपल्यावर त्याचाही किती उपयोग झाला. थोडक्यात पालथ्या घड्यावर पाणीच. आणि इतक्या वर्षात बदलले नाही ते एका महिन्याच्या कोर्समध्ये कसे बदलतील, हाही पोलीस अधीक्षकांनी विचार करावा.
केवळ अवैधधंद्यावर मोहिम राबविणे म्हणजे पोलिसिंग नव्हे तर, संपूर्ण जिल्हावासियांमध्ये सुरक्षित असल्याची भावना निर्माण करणे ही खरी पोलिसिंग आहे. जिल्ह्याच्या सुरक्षेची आपल्यावर जबाबदारी आहे, हेही अधीक्षकांनी विसरु नये. अधीक्षक साहेब किती तरी वर्षानंतर आपणा सारख्या पोलीस अधिकार्यांवर नागरिक भारी भरताहेत. आनंदी आहेत, त्यांचा आनंद टिकवून ठेवण्याइतपत किमान कामगिरी करा. आधी स्वतः दोन्ही डोळे उघडे ठेवून पारदर्शक काम करा व त्यानंतरच पोलिसांनाही ते करण्यासाठी नैतिक पाठबळ द्या. तर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहिल. चुकीचे ते चुकीचेच..याप्रमाणे आपणाकडून भविष्यात तरी कामगिरीची जनसामान्यांना अपेक्षा आहे. त्यांचा भ्रमनिरास करु नका एवढेच..