मुंबई : वर्षभरात उपनगरात चोर्या वा महिलांवरील हल्ले यामुळे नागरिकात भय पसरले असून, कांदिवलीतील काही सोसायट्यांनी आपल्या परीने रात्री जागता पहारा देणारी पथके तयार केली आहेत. कितीही तक्रारी करून पोलिस लक्ष देत नसल्याने नागरिकांनी हा मार्ग चोखाळला आहे. आता त्याचीच पुनरावृत्ती दक्षिण मुंबईत कुलाबा येथेही होऊ लागल्याचे कळते. प्रामुख्याने बेघर व भुरट्या गुन्हेगारांमुळे भयाचे वातावरण वाढते आहे.
मुंबईच्या अनेक भागात रस्त्यावरच संसार थाटलेले अनेकजण आहेत. त्यापैकी बहुतांश लोक नशाबाज असून, अमली पदार्थाच्या नशेत असतात. त्यांच्याकडून एकट्या दुकट्या नागरिक वा महिलेवरही हल्ले होतात. त्याविषयी पोलिसांकडे अनेक तक्रारी झाल्या आहेत. पण परिस्थितीत कुठलीच सुधारणा झालेली नाही. त्यामुळेच अनेक सोसायट्या व वस्त्यातील नागरीक व महिलांनी पुढाकार घेऊन रात्र रात्र जागरण करून पहारा देणारी पथके बनवली आहेत. ही पथके आसपासच्या फुटपाथ वा रस्त्यावर तळ ठोकून बसलेल्या संशयितांना हुसकावून लावण्याचे काम करत असतात. आता तशीच सुरुवात कुलाब्यातील काही नागरिकांनी केली आहे.
मुंबई हे अहोरात्र जागणारे शहर असले तरी काही भागात मध्यरात्री वा अपरात्री निर्मनुष्य जागाही असतात. अशा जागी उशिरा घरी परतणार्या महिला वा माणसांवर हल्ले होण्याच्या घटना नित्याच्या होऊ लागल्या आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी गस्त व पहार्यात हलगर्जीपणा केल्याने अशा भुरट्यांचे फावले आहे. यातून संशयितांवर हल्ले वा मारहाणीचेही प्रकार घडण्याची भीती आहे. म्हणूनच अशा नागरी पथकांना प्रोत्साहन मिळण्यापेक्षा पोलिसांनी गस्त व पहार्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे.