पुणे शहर गुन्हे अन्वेषण विभाग पथकांची ‘एसओपी’ करणार
पुणे : पुणे शहर गुन्हे अन्वेषण विभागाची (क्राइम ब्रॅन्च) पुर्नरचना केल्यानंतर आता प्रत्येक पथकाची नेमकी जबाबदारी काय असेल, त्यांनी कोणते काम करावे, याची ‘एसओपी’ (स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) बनविण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रत्येक पथकाला गुन्हे उघडकीस आणून त्यांच्या कामाची चमक दाखवून द्यावी लागणार आहे. या पथकांच्या तीन महिन्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन सुमार कामगिरी करणार्या पथकाच्या प्रमुखांची बदली करण्यात येणार आहे.
पुणे पोलिस दलातील गुन्हे शाखेतील संघटित गुन्हेगारी पथक पश्चिम आणि पूर्व, वाहनचोरीविरोधी पथक, दरोडा प्रतिबंधक विभाग, पॉपर्टी सेल आणि होमिसाइड सेल अशी सहा पथके बंद करण्यात आली असून, पाच नवीन पथके सुरू केली आहेत. यामध्ये खंडणी व अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाचे एकत्रीकरण केले आहे. त्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग तयार केले आहेत. युनिट चार, भरोसा सेल, प्रतिबंधक शाखा, तपास सहाय्य पथक आणि अभियोग सहाय्य पथक ही नवीन पथके तयार केली आहेत. बंद केलेल्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना नव्या पथकांमध्ये सामावण्यात आले आहे.
याबाबत गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी सांगितले, प्रत्येक झोनसाठी एक अशी पाच नवीन युनिट तयार केली आहेत. त्यांच्या हद्दीतील पोलिस ठाण्यांमध्ये घडणार्या जबरी चोर्या, घरफोड्या, खून, इतर गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी पथकांवर आहे. गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आदेश या पथकांना देण्यात आले आहेत. तीन महिन्यांमध्ये या पथकांना त्यांना देण्यात आलेले लक्ष्य पूर्ण करावे लागणार आहे. चांगली कामगिरी नसेल त्या पथकातील अधिकार्यांची व काम न करणार्या कर्मचार्यांच्या बदल्या केल्या जातील. गुन्हे शाखेतील पथकांनी कसे काम करायचे याची ‘एसओपी’ तयार केली जाणार आहे. गुन्हे शाखेतील अधिकार्यांशी चर्चा करून हे काम येत्या आठवड्याभरात पूर्ण करून सर्व पथकांना आदेश दिले जातील.
‘सीक रिपोर्ट’चा घेतला आधार
गुन्हे शाखेची पुनर्रचना केल्यानंतर मनाप्रमाणे पथक न मिळाल्यामुळे अनेक अधिकारी व कर्मचारी नाराज आहेत. त्यामुळे बरेच जण अद्याप हजर झालेले नाहीत. तर, काही जण ‘सीक रिपोर्ट’ करून सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे ‘सीट रिपोर्ट’ केला तरी सुट्टी मंजूर केल्याशिवाय कोणीही रजेवर जाऊ नये, असा आदेश काढण्याची वेळ आली आहे. यामुळे नव्या पथकांच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही हेच स्पष्ट होत आहे.