गुन्ह्यांचा पाढा अन विरोधकांचा राडा…!

0

नागपूर (हिवाळी अधिवेशनातून) – आज, हिवाळी अधिवेशनाच्या सेकंड लास्ट दिवशी चर्चेचा अक्षरश: किस पाडला गेला. दोन्ही सभागृहात वेगवेगळ्या महत्वाच्या गोष्टींवर सखोल चर्चा घडली. आता दोन दिवस सखोल चर्चा घडणारच होती अशी चर्चा अनुभवी लोकांमध्ये कालपासूनच सुरु होती आणि ते 100 टक्के खरं ठरलं. सभागृहात हे नेतेमंडळी म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक बोलूही शकतात आणि नागरिकांच्या समस्यांची त्यांना जाण असते हे देखील तंतोतंत पटले. मात्र प्रत्येक चर्चेत विरोधक सत्ताधार्‍यांना ‘फक्त तुमचीच चूक आहे’ असं सांगत बसतात तर सत्ताधारी ‘तुमच्या काळात ह्यापेक्षा बेक्कार होतं’ असं सांगत बसतात. चर्चा मात्र होतेय हीच काय ती समाधानकारक बाब. अर्थातच वर्तमानात बोलणे आवश्यक आहे. मात्र आज परिषदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील गुन्ह्याचा असा काही पाढा वाचला की कुठल्याही संवेदनशील माणसाला नक्कीच विचार करायला भाग पाडले.

खरंच या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे का? असा सवाल आज उपस्थित होतोय. राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण खरोखर किती भयानक प्रमाणात वाढलेय हे एसी सभागृहात बसून ऐकत असताना निश्चितच अंगावर काटा उभारला. संपूर्ण राज्यता कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महिला, मुली व आदिवासी मुलींवर बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे महिला आणि विद्यार्थिनींमध्ये दहशत पसरली आहे. राज्यात सायबर गुन्हे, बलात्कार, चोर्‍या, विनयभंग, खून आदी गंभीर गुन्हे वाढत चालले आहेत आणि या गुन्ह्यांवर अंकुश आणण्यात सरकार अपयशी ठरत आहे. पुरोगामी समजल्या महाराष्ट्रात गुन्हेगारीवर अंकुश आणण्यावर आता सरकारने विचार निश्चितच करावा. विरोधकांनी राज्यात क्राईम कसा वाढतोय हे अगदीच तळमळीने सांगितले मात्र हे सांगताना राज्यातील सगळं क्राईम फक्त ‘नागपूरला’ केंद्रित करण्याचे काम विरोधकांनी केले. नागपूरला जास्त बदनाम का केले जातेय? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच आपल्या सर्वांना माहीत आहे. नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून विरोधकांनी संबोधले. यावेळी नागपूरात अनेक चांगल्या गोष्टीही आहेत हे सांगायला मात्र ते विसरले. अर्थात नागपूरात क्राईम नाही असं म्हणायचं नाहीये मात्र क्राईम कुठे नाही? गुन्हेगारी सगळीकडे आहे. प्रमाण कमी जास्त आहे. मात्र केवळ मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यासाठी असले आरोप करणे खरोखर चुकीचे आहे. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत म्हणून शहराची बदनामी कशाला? हे तर विकासाचं उदाहरणं सांगायचं झालं तर बारामतीचे उदाहरणं देण्यासारखाच प्रकार आहे असं वाटतं. गुन्ह्यांचा अक्षरश: डोंगर सरकार समोर असताना सरकार निश्चितपणे गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरले आहे हे नक्की. गुन्हे घडत असताना देखील आम्ही यंव केलं आम्ही त्यंव केलं असं सरकारकडून म्हटलं जाणे जेवढं चुकीचं आहे तेवढंच विरोधी पक्षाने आपल्या कारकिर्दीत काय अवस्था होती हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

असो. क्राईमचा विषय फार मोठा आहे. आणि हे क्राईम कमी करण्यासाठी प्रभावी अधिकार्‍यांचे प्रशासनात असणे आवश्यक आहे. म्हणूनच जनता आता पोलीस दलात ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या आगमनाची वाट पाहत आहे. आज गेल्या वर्षीच्या दुसर्‍या महाराष्ट्र केसरीनंतर नोकरीचे आश्वासन मिळालेल्या विजय चौधरींचे तिसर्‍यांदा महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला गेला. आणि पुन्हा एकदा लवकरच त्यांना शासकीय नोकरी देऊ असे आश्वासन दिले गेलेय. आता महाराष्ट्राला विजय चौधरींच्या रुपात सिंघम प्रत्यक्षात कधी मिळणार? हा नवा प्रश्न आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी विशेष काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सोबतच अनेकांना घरी परतण्याची लगबग असल्याचे अनेक जण परतीचे तिकिट कन्फर्म करण्याच्या चिंतेत दिसून येत आहेत.

निलेश झालटे

9822721292