गुन्ह्याऐवजी भिंत बांधण्यावर ‘मांडवली’

0

सभापतींच्या भिंत बांधून देण्याच्या आश्‍वासनानंतर व्यापार्‍यांचे बेमुदत बंद मागे; जनशक्तिच्या वृत्तांची दखल; व्यापार्‍यांनी मानले जनशक्तिचे आभार

जळगाव- कृषी बाजार समितीच्या भिंत पाडण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांनाही तुघलकी पध्दतीने एकाच दिवसात होवून भाजीपाला मार्केट ते धान्य मार्केट पर्यंतची सुमारे 300 मीटर लांबीची कुंपण भिंत पाडण्यात आली होती. याप्रकरणी भिंत पाडण्यार्‍या विकासकावर गुन्हा दाखल करण्याऐवजी भिंत बांधण्याबाबत सभापती कैलास चौधरी यांनी विकासक व व्यापारी यांच्यात मांडवली केली आहे. सभापतींच्या मांडवलीनंतर विकासकाने नवीन भिंत बांधून देण्याचे तोंडी आश्‍वासन दिल्यावर व्यापार्‍यांनी बेमुदत बंदचे आंदोलन मागे घेतले असून मंगळवारी पुर्ववत दुकाने सुरु केली आहे. दरम्यान जनशक्तिच्या पाठपुराव्याबद्दल व्यापार्‍यांनी जनशक्तिचे आभार मानले आहे.

शेतकरी आणि व्यापारी हिताचे निर्णय घेण्याऐवजी पद मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतींना व्यापार्‍यांना अंधारात ठेऊन 300 मिटरची कुंपण भिंत चक्क सुटीच्या दिवशी पाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. व्यापार्‍यांना कुठलीही पूर्वसुचना न देता तसेच नियमबाह्य पध्दतीने भिंत पाडल्याचा आरोप करत पुन्हा पर्यायी संरक्षण भिंत बांधून देण्यासाठी मागणीसाठी व्यापार्‍यांनी बेदमुत बंदचे अस्त्र उगारले होते. सोमवारी बेमुदत बंद झाल्यानंतर मंगळवारी सकाळी 11 पुन्हा आडत असोसिएशनसह व्यापार्‍यांची बैठक झाली. यात बैठकीत सभापतींनी दिलेल्या तोंडी आश्‍वासनाबाबत चर्चा झाली. यानंतर सर्वांनी सुरेशदादा जैन यांची भेट घेतल्यानंतर सुरेशदादांनी सभापतींशी चर्चा केली होती. त्यानुसार सभापती कैलास चौधरी यांनी व्यापार्‍यांना नवीन भिंत बांधण्याबाबत आश्‍वासन दिले. यावेळी व्यापार्‍यांनी सुरेशदादा जैन यांचेही आभार मानले. यावेळी आडत असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब बेहरे,
आश्‍वासनंतर व्यापार्‍यांनी बंद मागे घेवून पुर्ववत दुकाने सुरु केली.

न्यायप्रविष्ठ प्रकरण असतांना भिंत पाडलीच कशी?
व्यापार्‍यांनी भिंत पाडल्यानंतर संकुल बांधण्यास विरोध नाही मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयाच्या निकालानंतरच योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत पत्रकार परिषदेत होते. भिंत पाडल्यानंतर हे प्रकरण नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचे लक्षात आल्यावर सभापतींनी घुमजाव करत आता न्यायालय पविष्ठ असल्याने हा प्रकार चुकीचा असून न्यायालयाच्या निकालानंतर काय तो निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्याचे माहिती असतानाही, विकासकाने भिंत पाडलीच कशी, हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत आहे.

नुकसानानंतर प्रत्येकवेळी मांडवली होईल का?
लाखो रुपये खर्च करुन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भिंतीची रंगरंगोटी, तसेच प्रसाधनगृह, पाण्याच्या टाक्या, शौचालये बांधण्यात आली होती. मात्र एकाच दिवसात विकासकाने ते जमीन दोस्त केले. नुकसानानंतर करुन आता विकासक त्याच्या खर्चातून ही पुन्हा नवीन भिंत तसेच प्रसाधनगृह, शौचालये बांधून देणार आहे. अशाप्रकारे यापुढेही कृऊबाचे काही नुकसान झाल्यास, अशाच प्रकारे मांडवली करुन प्रकरणावर पदडा टाकला जाईल काय? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. याबाबत विचारल्यावर सभापती कैलास चौधरी यांनी बाजार समितीचे नुकसान होईल, बाजार समिती उघड्यावर पडेल म्हणून सामोपचाराने प्रकरण जनशक्तिशी बोलतांना सांगितले.

जनशक्ति वृत्तांची दखल
भिंत पाडल्याच्या घटनेनंतर हा प्रकार कसा नियमबाह्य आहे, अर्थपूर्ण राजकारणातून कशा पध्दतीने प्रकरण घडले, यासह व्यापारी संकुल बांधण्यानंतर कुणाचा व कसा फायदा होईल अशा सर्व बाबींनी दैनिक जनशक्तिने निर्भीडपणे वृत्त प्रकाशित करुन या प्रकरणातील तथ्य तसेच सत्य उजेडात आणले होते. जनशक्तिने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर कृऊबा प्रशासनासह विकासक खडबडून जाग आली. व मंगळवारी सकाळी सभापतींनी व्यापार्‍यांसमोर विकासकाला नवीन भिंत बांधून देण्याचे सांगितले. व दोन दिवसात काम भिंत बांधण्याचे काम सुरु होईल, असे विकासकाने यावेळी आश्‍वासन दिले.

व्यापार्‍यांनी जनशक्तिचे मानले आभार
जनशक्तिने शेतकर्‍यांचे हित लक्षात घेवून भिंत पाडल्याचा विषय लावून धरला होता. यात नेमका प्रकार चुकीचा कसा, सत्य काय हे याबाबत सलग तीन दिवस वृत्त प्रकाशित सत्य उजेडात आणले होते. नवीन भिंत बांधून देण्याचा निर्णय झाल्याने त्याबाबत आडत असोसिएशनसह व्यापारी वर्गाने जनशक्तिचे आभार मानले आहे. आडत असोसिएशनचे सचिव सुनील तापडीया यांनी जनशक्ति प्रतिनिधीला फोनवरुन सडेतोड वृत्तांबाबत व्यापारी वर्गाच्या बाजून धन्यवाद दिले असून व्यापार्‍यांच्या वतीने जनशक्ति कार्यालयात आभाराचे पत्र पाठविणार असल्याचेही सांगितले.