वॉशिंग्टन । आयसीएस या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांचा जगभरातून निषेध केला जात आहे. त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात असताना अमेरिकेतील एफबीआयची एक गुप्तहेर महिला मात्र चक्क या दहशतवादी संघटनेत सक्रिय असलेल्या एका अतिरेक्याच्या प्रेमात पडली. इतकेच नाहीतर या महिलेने त्या अतिरेक्यासोबत पळून जाऊन लग्नही केले आहे. पण एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभावी अशी ही घटना इतक्यावरच संपत नाही. काही दिवसांत या महिलेला पश्चात्ताप झाला आणि आता ती मायदेशी परतली आहे. या महिलेवर कारवाई करण्यात आली असून सध्या ती तुरुंगात आहे.
‘सीएनएन’ने दिलेल्या वृत्तानुसार, डॅनियल ग्रीन असं या महिलेचे नाव आहे. ती 2014 मध्ये सीरियाला आली होती. तिथेच तिने आयएसचा अतिरेकी असलेल्या डॅनिस कस्पर्ट या जर्मन व्यक्तीशी लग्न केलं. ही घटना घडल्यानंतर अमेरिकेच्या एका न्यायाधीशाने हे प्रकरण सार्वजनिक न करण्याचा आदेश दिला होता. मात्र, फेडरल कोर्टाचे सर्व रेकॉर्ड जनतेसाठी खुले करण्यात आल्यानंतर ग्रीनच्या प्रेमकहाणीचाही खुलासा झाला आहे.
फेब्रुवारी 2015 मध्ये अमेरिकन सरकारकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या डॅनिसला शोधून काढण्याची जबाबदारी ग्रीनवर सोपवण्यात आली होती. हे काम तिच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर सहा महिन्यांनी ती सीरियाला गेली होती. तिथेच तिने डॅनिसशी विवाह केला. आयसीएसच्या प्रचाराच्या एका व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या मुंडक्यासोबत डॅनिस दिसला होता.
ग्रीन मूळची चेकोस्लोव्हाकियाची आहे. आई-वडिलांना भेटायला जर्मनीला जात असल्याचे एफबीआयला खोटे सांगून ती सीरियाला गेली होती. जर्मनीऐवजी ती आधी तुर्कस्थानात पोहोचली. तिथून स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने सीमापार करून ती सीरियाला आली. धक्कादायक म्हणजे डॅनिसशी विवाह करण्यापूर्वी तिचे लग्न झालेले होते. अमेरिकन नवर्याला घटस्फोट न देताच तिने हे लग्न केले.