दार्जिलिंग । स्वतंत्र गोरखालँड मागणीसाठीचं आंदोलन दिवसागणिक चिघळतच आहे. गोरखालँड जनमुक्ती मोर्चा म्हणजेच जीजेएमने पश्चिम बंगाल सरकारशी कोणतीही चर्चा करायला नकार दिला आहे. मात्र त्याचवेळी केंद्र सराकरशी बोलणी करण्यासाठी अनुकूलता दाखवली आहे. जीजेमचे नेते विनय तमांग म्हणाले की, आम्ही आमचे अधिकार आणि स्वातंत्र्यासाठी लढत आहोत.पण, ममता बॅनर्जी यांनी दहशतवादी संबोधून आमचा अपमान केला आहे. स्वतंत्र गोरखालँड राज्याच्या मागणीसाठी गेल्या 10 दिवसांपासून दार्जिलिंगमध्ये आंदोलन पुकारण्यात आलं आहे. दरम्यान शनिवारी जीजेएमनं काही ठिकाणी दगडफेक तसंच पेट्रोल बॉम्ब फेकले. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पश्चिम बंगाल पोलिसांना अश्रूधुराचा मारा करावा लागला होता.
विभाजन होऊ देणार नाही
दार्जिलींगमधील चिघळलेल्या परिस्थितीबाबत बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, गुरखा आंदोलन हे एक मोठे कारस्थान आहे. एका दिवसात मोठ्या प्रमाणात हत्यारे गोळा होऊ शकत नाही. दार्जिलींगच्या वेगवेगळ्या भागांमध्ये देशी परदेशी पर्यटक अडकले आहेत. त्यामुळे देशाची बदनामी होत आहे. पण कुठल्याही परिस्थितीत पश्चिम बंगालचे विभाजन होऊ देणार नाही.