गुरखा जनमुक्ती मोर्चाच्या कार्यालयांवर पोलिसांचे छापे

0

दार्जिलींग । वेगळ्या राज्याची मागणी करणार्‍या गुरखा जनमुक्ति मोर्चाच्या अनेक कार्यालयांवर पश्‍चिम बंगाल पोलिसांनी गुरुवारी छापे मारले. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार या छाप्यांमध्ये 300 ते 400 हत्यारे आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली. आपल्या मागण्यांसाठी गुरखा जनमुक्ति मोर्चाने चार दिवसांपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बंददरम्यान झालेल्या हिसांचारामुळे पश्‍चिम बंगाल पोलिसांनी गुरखा जनमुक्ति मोर्चांचे प्रमुख बिमल गुरंग यांचे निवासस्थान आणि त्यांच्याशी संबधीत असलेल्या ठिकाणांवर छापे मारले.

ममता बॅनर्जीची कडक भूमिका
गुरंग यांनी वेगळ्या राज्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिला होता. या इशार्‍यानंतर बॅनर्जी यांनी कडक भूमिका घेत पोलिसांना छापे मारण्याचे आदेश दिले. दार्जिलींगसह सिंगमारी, पेटलीबास विभागातील गुरखा जनमुक्ति मोर्चाच्या कार्यालयांवर छापे मारण्यात आले. या छाप्यांमध्ये काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या गुरखा जनमुक्ति मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पेडाँग पोलिस स्थानक जाळले.

केंद्राने दखल द्यावी
रोशन गिरी म्हणाले की राज्य पोलिस कुठल्या पद्धतीने कारवाई करत आहेत ते आम्ही केंद्र सरकारला कळवले आहे. दार्जिलींगमध्ये तयार झालेल्या परिस्थितीला तृणमुल काँग्रेसचे सरकार जबाबदार आहे. पोलिसी बळाने आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी मागणी केल्यामुळे या भागामध्ये लष्करही तैनात करण्यात आले आहे.

पश्‍चिम बंगाल सरकारच्या या कारवाईमुळे आंदोलक नाराज झाले आहेत. मात्र या कारवाईनंतरही दार्जिलींग बंदच राहणार असल्याचे गुरखा जनमुक्ति मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. गुजमोचे महासचिव रोशन गिरी म्हणाले की, पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची आहे. वेगळ्या राज्याची मागणी करत असल्यामुळे आमच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. कुकरी, धनुष्यबाण सारखी हत्यारे गुरखांकडे नसणार तर कोणाकडे असणार? या व्यतिरिक्त काय हत्यारे मिळाली ते पोलिसांनी सांगावे.