रावेर : रावेर तालुक्यातील गारखेडा-निमड्या गावाकडे जाणार्या रस्त्यावर अवैधरीत्या गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली असता पोलिसांना पाहताच दोघे पसार झाले तर 13 गोवंशाची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गारखेडा-निमड्या गावाकडे जाणार्या रस्त्यावर रविवार, 18 जुलै रोजी पहाटे 2.10 वाजेच्या सुमारास एका वाहनातून कत्तलीच्या इराद्याने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत असता संशयीत आरोपी शेख ताजु शेख जोहर व शेख नय्युम शेख सलीम (दोघे रा.पाल, ता.रावेर) हे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. यावेळी 65 हजार किमतीचे 9 गोर्हे तर 52 हजार किंमतीच्या तीन गायी व एक वासरी मिळून एक लाख 17 हजार किंमतीचे गोवंश ताब्यात घेण्यात आले. सर्व गुरांची जळगावच्या आर.सी.बाफना, गोशाळेत रवानागी करण्यात आली. ही कारवाई रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र राठोड, कॉन्स्टेबल संदीप धनगर, दीपक ठाकूर, नरेंद्र बाविस्कर, महेश मोगरे, पोहेकर, विकार शेख आदींच्या पथकाने केली. या प्रकरणी दीपक ठाकूर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजेंद्र राठोड हे करीत आहेत.