धुळे । मुंबई-आग्रा महामार्गावरुन होणारी गुरांची तस्करी बुधवारी भल्या पहाटेच्या सुमारास उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले असून या कारवाईमुळे केवळ गुरांचे प्राणच वाचले नाही तर वाहनासह गुरे मिळून लाखोंचा ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यातही घेण्यात आले आहे. काल मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांना गुरांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक आर.एस. सोनवणे, पो.ना.एम.एम.मोबीन, पोकॉ. एच.के.महाजन, पंकज खैरमोडे यांना सत्यता पडताळणीचे आदेश दिले. त्यामुळे सदर पथक मुंबई-आग्रा महामार्गावर लक्ष ठेवून होते.
मिळालेल्या माहितीनुसार संशयित असलेली एम.एच.18/एसी-6583 ही आयशर गाडी शिरपूरहून मालेगावकडे जातांना नालंदा हॉटेलजवळ दिसली असता या पथकाने ती गाडी रस्त्याच्या बाजूला लावण्यास सांगून तीची तपासणी केली.
आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
यावेळी गाडीत 18 बैल कोंबलेले आढळून आले. तर गाडीत चालक युसूफ हमीद शेख (38) रा.नटराज टॉकीजजवळ,धुळे, शरीफ मुनाफ शेख (41),आणि ईस्माईल मुनाफ शेख (19) दोघे रा.जामचामळा, धुळे असे तिघे बसले होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना सदरची गुरे कुठे नेली जात आहेत याबाबत समाधानकारक उत्तर देता न आल्याने व तशी कागदपत्रे दाखविता न आल्याने त्यांना आझादनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि पुढील कारवाई आझादनगर पोलिसांना करण्यास सांगण्यात आले. आझादनगर पोलिसांनी 3 लाख 50 हजार रुपयांच्या आयशर गाडीसह 10 ते 15 वर्ष असलेले एकूण 18 बैल जप्त केले. त्यांची किंमत 2 लाख 70 हजार रुपये इतकी आहे तर ताब्यात घेतलेल्या तिघांविरुध्द याप्रकरणी आझादनगरचे उपनिरीक्षक चंद्रकांत बागूल यांनी सरकारपक्षातर्फे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.