गुरांची वाहतूक करणारा ट्रक संतप्त जमावाने पेटविला

0

रावेर । तालुक्यातील खानापूर जवळ अवैधरित्या गुरांची वाहतुक करणारा ट्रक परिसरातील नागरिकांनी पकडला असता त्यातून 46 जिवंत तर दोन मयत गुरांची सुटका पोलिस व गोरक्षकांनी करुन संतप्त जमावाने ट्रक पेटविल्याने अज्ञात चालकासह ट्रक पेटविणार्‍यांविरुध्द रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिवहन विभागाच्या तपासणी नाक्याजवळ ट्रक (क्रमांक एम.पी.09 एच.एफ.6094) गुरांनी भरलेल्या अवस्थेत पकडण्यात आला आहे. त्यातून 4 लाख 60 हजारांचे 46 जिवंत गुरे तर 20 हजाराचे 2 मयत गुरे जप्त करण्यात आली आहेत.

प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता
दरम्यान रावेर परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गायींची कत्तलीसाठी वाहतुक होत असल्याचे समजते. या अगोदर देखील वारंवार गुरांची वाहतुक करणारे ट्रक पकडण्यात आले आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना देखील गुरांच्या वाहतुकीवर निर्बंध येत नसल्यामुळे प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

पोलीसांच्या हस्तक्षेपाने हानी टळील
प्राण्यांच्या छेड प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल निलेश चौधरी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रक चालक व क्लिनरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुरे उतरविण्यात आल्यानंतर उभ्या असलेल्या खाली ट्रकला काही नागरिकांनी पेटटवून दिला यात ट्रकची कॅबीन जळाली वेळीच पोलीसांनी हस्तक्षेप केल्याने मोठी हानी टळली असून ट्रक पेटविणारे आठ ते दहा जणांविरुध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कैलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ज्ञानेश फडतळे व कर्मचारी करीत आहे.