गुरांची सुटका : चौघांविरुद्ध गुन्हा

0

वरणगावात संयुक्त कारवाईत पाच गुरांना जीवदान : तिघा आरोपींना पोलिसांकडून अटक

वरणगाव : कत्तलीच्या उद्देशाने गुरे आणल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करीत पाच गुरांची सुटका करण्यात आली तसेच एक टाटा मालवाहतूक रीक्षा ताब्यात घेत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तीन संशयीतांना अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
वरणगावात कत्तलीसाठी गुरे आणल्याची गुप्त माहिती जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी राजेश मेढे, संजय हिवरकर, जितेंद्र पाटील, शरद भालेराव, संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अशरफ निजामुद्दीन शेख, सुरज पाटील, प्रमोद लाडवंजारी, रमेश जाधव, मुरली दरबारी यांना कारवाईच्या सूचना केल्या होत्या. पत्री गोठ्याच्या बाजूला माल वाहतूक करणारी रीक्षा (एम.एच. 12 जी.टी. 3189) मध्ये तीन गोर्‍हे तर गोठ्यामध्ये दोन वासरी आढळली. नाजीम शेख नाझीर शेख (26), नोयद शेख नाझीर शेख (25), चालक नदीम शेख नईम शेख (28) यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. यावेळी पाच गुरांसह टाटा कंपनीचे रीक्षा मिळून दोन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जागेचे मालक बशीर उर्फ चड्डा सूपडु शेख कुरेशी यांच्या जागेत हा प्रकार घडल्याने चौघांविरुद्ध गुन्हे शाखेचे किरण धनगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. तिघा आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली.