निजामपूर। साक्री तालुक्यातील जैताणे गावात गुरांचे मांस विक्री होत असल्याचे आज सकाळी आढळून आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तथापि, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत मांस विक्री करणार्या इसमावर गुन्हा दाखल केल्याने तणाव निवळला.याबाबत मिळालेली माहिती अशी की, जैताणे गावातील अश्पाक मुनाफ कुरेशी हा घराजवळ गुरांचे मांस विक्री करीत असल्याची खबर मिळाल्याने गावातीलच शरद पेंढारे, नितीन पगारे, प्रकाश पाटील, अर्जुन अहिरे या तरुणांनी त्या ठिकाणी जावून खात्री केली असता गुरांचे मांस विक्री होत असल्याचे आढळून आले.
शरद पेंढारे यांनी तत्काळ या घटनेची खबर निजामपूर पोलिसांना दिल्याने पोलिसही घटनास्थळी धावले. मात्र तोपावेतो त्या ठिकाणी तरूणांसह नागरीकांनी गर्दी केल्याने तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता अश्पाक कुरेशी याने सुमारे 25 ते 30 किलो गुराचे मांस नंदुरबार येथुन मोटरसायकलवर आणल्याची आणि ते येथे विकत सल्याची कबुली दिली. पोलिसांनी सदरचे मांस जप्त केले असून त्याची किंमत 4200 रुपये इतकी आहे. दरम्यान, शरद पेंढारे यांची फिर्याद नोंदवून घेत पोलिसांनी अश्पाक मुनाफ कुरेशी याच्यावर मुंबई पोलीस अॅक्ट तसेच महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधि नियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.