राजस्थानच्या शिक्षण मंत्र्यांचा दावा
जयपूर : गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने नव्हे तर ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी मांडला होता, असा दावा राजस्थानचे शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी केला आहे. ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी मांडलेल्या सिद्धान्ताचा अभ्यासक्रमात समावेश का करत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. राजस्थान विद्यापीठाच्या स्थापना दिवसनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सखोल अभ्यास केला तर समजेल
देवनानी म्हणाले, आजपर्यंत गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने मांडला असे तुम्ही शिकला आहात, मी देखील हेच शिकलो. पण तुम्ही सखोल अभ्यास केला तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनच्या अगोदर हजारो वर्षांपूर्वी ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी मांडल्याचे दिसेल. आपण आधुनिक विज्ञानाचे धडेही दिलेत पाहिजे. उत्तम दर्जाच्या शालेय शिक्षणातूनच उच्च शिक्षणाचा भक्कम पाया रचला जाऊ शकतो.
दुसरा कन्हैया घडू नये
राजस्थानमध्येही दुसरा कन्हैया घडू नये, याकडे विद्यापीठांनी लक्ष दिले पाहिजे. उच्च शिक्षणातून फक्त चांगले पॅकेज घेणारे विद्यार्थी घडत आहे. पण संस्काराचे मूल्य कमी होत आहे. विद्यापीठांनी संशोधनाला प्राधान्य द्यावे, यामुळे देशातील अनेक समस्यावर तोडगा निघू शकेल. भाजपच्या काळात पाठ्यपुस्तकांमध्ये झालेल्या बदलांकडेही देवनानी यांनी लक्ष वेधले. पहिली ते 12 वी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये बदल झाला आहे. राजस्थानमध्येही अकबर हा चांगला राजा होता असे शिकवले जायचे. पण नंतर आम्ही हा धडाच पाठ्यपुस्तकातून वगळला. त्याऐवजी महाराणा प्रताप यांना पुस्तकात स्थान दिले, असा दावा त्यांनी केला.