गुरुद्वारा, संतनगर वस्त्यांना वाली कोण?

0

येरवडा । लोहगावातील दादाची पडळ या वस्तीसह गुरुद्वारा, संतनगर या भागाचा 40 ते 45 वर्षांपूर्वी महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. मागील प्रभाग पद्धतीनुसार या भागाचा धानोरी या प्रभागात समावेश करण्यात आला होता. मात्र नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीमध्ये या परिसराचा प्रभाग क्र. 3 विमाननगर या प्रभागात समावेश करण्यात आला असला तरी या वस्त्यांना वाली कोण? असा मुख्य प्रश्‍न उपस्थित होत आहे. दादाची पडळ वस्तीपर्यंत तर आजतागयत सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक विकासापासून वंचीत आहेत. समस्यांच्या विळख्यातून त्यांची मुक्तता होणार का? असा संतप्त सवाल रिपब्लिकन प्रेसिडियम पार्टी ऑफ इंडियाचे संघटक अशोक तनपुरे यांनी केला आहे.

पालिका फुकट लाटते कर
पालिकेच्या वतीने करण्यात येणारी विकासकामे ही जनतेच्या करातून करण्यात येत आहे. मात्र गेल्या 40 वर्षांपासून परिसराचा विकास खुंटल्यामुळे पालिका गोरगरीब जनतेचा कर फुकट लाटत असल्याचेच येथील परिस्थितीवरून दिसत आहे. आता गप्प बसून चालणार नाही. याविरोधात आवाज उठविणार असल्याचे अशोक तनपुरे यांनी सांगितले.

पाण्यासाठी वणवण
पाण्याची सुविधा नसल्याने वर्षाच्या बारा महिने येथे पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवते. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकावे लागते. टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अशा परिस्थितही गेल्या 40 वर्षात पालिकेचा एक ही अधिकारी येथे फिरकलेला नाही. नव्याने निवडून आलेले सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधींनीही यावा वस्त्यांना अद्याप भेट दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विकासकामांना खो
पालिका निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षातील उमेदवारांनी परिसरातील विकासकामे करण्याचा दावा केला होता. मात्र तोही फोल ठरला असून राजकीय नेत्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजून खाण्यासाठी दिलेली आश्‍वासने ही फुसका बार ठरल्याचे दिसून येत आहे. जर या वस्त्यांचा पालिकेत समावेश होऊन 40 वर्षे उलटून देखील जर विकासकामांना खो बसत असेल तर नव्यानेच पालिकेत समावेश करण्यात आलेल्या लोहगाव भागाचा विकास होणार का? असा सवाल तनपुरे यांनी केला असून नागरिकांचे असलेले प्रलंबित प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तनपुरे यांनी दिला आहे.

रस्त्यांची दुरवस्था
प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या वस्त्यांचा ह्या-त्या प्रभागात समावेश होत असल्याने परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. दत्तमंदिरच्या पाठीमागील वस्ती परिसरात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली असून सिमेंट काँक्रीटीकरण सोडाच पण साधा डांबरी रस्ता देखील नसल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. या मार्गावर पथदिवे ही नसल्याने रात्रीच्या सुमारास खड्ड्यांचा व रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असतात. रात्रीच्या अंधारात ज्येष्ठ नागरिकांना चालणे देखील अवघड होत आहे. तर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.