रावेर। अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे श्रध्दास्थान असलेले वृंदावन धाम मंदिर तथा ब्रह्मलिन चैतन्य लक्ष्मण बापू यांचे समाधीस्थळी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त पाल आश्रमात तयारी पूर्णत: झालेली आहे. 8 जुलै रोजी देशभरातील साधक आश्रमात दाखल होणार आहे. 9 रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. चारुकेश्वर, मध्यप्रदेश, औरंगाबाद, कन्नड तथा जामनेर येथील आश्रमातील 435 किमीचा पायी प्रवास टाळ मृदंगाच्या गजरात भाविकांतर्फे होणार आहे. पायी यात्रेदरम्यान प्रत्येक 30 किमीवर नास्ता पाण्याची सुविधा अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराने केलेली आहे.
45 हजार भाविकांचे नियोजन
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी 8 दिवस अगोदर नियोजन केलेले आहे. आश्रमात गुरुदर्शनासाठी भाविक, साधक, शिष्य, साधुसंत, आश्रमातील भक्तगण यांच्या सोयी सुविधांसाठी साधक परिवारातर्फे आढावा बैठक घेवून नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर 45 हजार भाविकांचे नियोजन आहे. 9 जुलै रोजी समाधी दर्शनार्थ भाविकांची मांदियाळी उसळेल. वर्षभरातील सर्वात मोठी पौर्णिमा असून गुरु दिक्षीत साधक, भक्तगण, अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार, साधु संत यांची रेलचेल आश्रमात दिसेल. सकाळी 7 वाजता पादुका पुजन, महाआरती, आश्रमाचे गादीपती गोपाल चैतन्य बाबाजी यांचे सत्संग नंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
दरवर्षी गुरुपौर्णिमेला अथवा आश्रमातील प्रत्येक कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र व्यवहार करण्यात येतो. वारंवार कळवून सुध्दा रावेर पाल रस्त्यांची झालेली दयनिय अवस्था झाली असून रस्त्यावर 2 ते 3 फुटापर्यंत खोल गड्डे पडल्याने दुरुस्ती बांधकाम विभागाने केली नाही. रावेर- पाल रस्त्यांची अवस्था बघून भाविक तथा भक्तगण तो मार्ग बदलून घाट मार्गे पालकडे येणे पसंत करतात.