शिर्डी । नुकत्याच पार पडलेल्या गुरूपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या शिर्डीला साजर्या झालेल्या तीन दिवसीय सोहळ्यात देशविदेशातून साईभक्तांनी फकीर बाबांच्या झोळीत तब्बल साडेपाच कोटींहून अधिक दान टाकले असल्याचे शिर्डी संस्थानातर्फे जाहीर करण्यात आले. सात ते दहा जुलै दरम्यान शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सव साजरा केला गेला. बाबांच्या आशीर्वादासाठी शिर्डीत भाविकांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती. जमा झालेल्या दानात वीस देशातून आलेले 9 लाख 30 हजार 380 चे परकीय चलन आहे. त्यात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूएई, यूके, नेपाळ या देशांचा समावेश आहे. यंदा एकूण पाच कोटी 52 लाख रूपये दानात आले असून गतवर्षीपेक्षा ही संख्या दीड कोटींनी जास्त आहे.
ऑनलाइन देणग्या
दक्षिणा पेटीत 2 कोटी 14 लाख 3 हजार 218 रूपये,देणगी कौंटरवर 1,44,9,662 रूपये, डेबिट क्रेडीट कार्डमधून 29,67,882 रूपये, ऑनलाईन देणगीतून 2,80,763 रूपये, चेक डीडी 31,20,200 रूपये आले आहेत. 59 लाखाहून अधिक किंमतीचे 2233.900 ग्रॅम सोने व आठ किलोपेक्षा अधिक चांदी आली आहे. संस्थानच्या कोषात सध्या 450 किलो सोने, 4500 किलो चांदी व 1800 कोटींच्या ठेवी असा संग्रह आहे.