गुरुमीत रामरहीमला सोमवारी शिक्षा ठोठावणार

0

सिरसा : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख तथा स्वयंघोषित धर्मगुरु गुरुमीत रामरहीम सिंग याला सोमवारी दोन साध्वींवरील बलात्कार व लैंगिक शोषणप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय शिक्षा ठोठावणार आहे. या पार्श्वभूमीवर पंचकुलासह त्याचे मुख्यालय असलेल्या सिरसा येथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, भारतीय लष्कराने त्याच्या मुख्यालयाभोवती फास आवळला होता. अद्यापही त्याच्या डेर्‍यात राज्यभरातून आलेले किमान दहा हजार समर्थक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कालचा हिंसाचार भाडोत्री गुंडांमार्फत घडविण्यात आल्याचे पुरावे हाती आले आहेत. रोहतक येथील कारागृहातच न्यायालय भरविले जाणार असून, तेथेच गुरुमीत सिंग याला शिक्षा ठोठावण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. त्यामुळे रोहतकसह राज्याच्या विविध संवेदनशील भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून, जमाव हिंसक झाल्यास दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हरियाणासह शेजारच्या पंजाबमध्येही हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

दुपारपर्यंत शिक्षा ठोठावणार!
डेरा सच्चा सौदाप्रमुख गुरुमीत रामरहीम सिंग याला विशेष सीबीआय न्यायालय सोमवारी दुपारी अडिच वाजेच्या सुमारास शिक्षा ठोठावणार आहे. सद्या गुरुमीत याला रोहतक कारागृहात ठेवण्यात आलेले असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा अतिरिक्त पोलिस महासंचालक मोहम्मद अकील यांनी आढावा घेतला. सिरसा येथे संचारबंदी हटविण्यात आल्यानंतर त्याचे समर्थक हिंसक झाले होते. परिणामी, पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. प्रसारमाध्यमांच्या वाहनांवरही हल्ले करण्यात आले. त्यात एक पत्रकार गंभीर जखमी झाला आहे. पंचकुला, सिरसासह पाच राज्यांतील 17 शहरांत हिंसाचार उफळण्याची शक्यता पाहाता, कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हरियाणामध्ये 48 तासांकरिता इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, दंगलखोरांवर कठोर कारवाईचा इशाराही पोलिसप्रमुखांनी दिला आहे. लष्करानेही ठीकठिकाणी बॅरिकेडस लावले होते.

छाप्यात शस्त्रे, स्फोटके हस्तगत
सिरसा येथील डेरा मुख्यालयाबाहेर लष्कराने जवान तैनात केले असून, पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी डेरा सच्चा सौदाच्या 130 ठिकाणांवर छापेसत्र राबवून लाठ्याकाठ्या, रॉड आणि इतर साहित्य जप्त केले आहे. पेट्रोल बॉम्ब तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमा केलेले पेट्रोलही जप्त करण्यात आले आहे. तसेच, नियमित तपासणीदरम्यान काल एक एके-47 रायफल व काही पिस्तूलदेखील हस्तगत करण्यात आले होते. डेरासमर्थकांकडून प्रसारमाध्यमांवरील हल्ले सुरुच असून, लष्कराने डेरा मुख्यालयात जमा झालेल्या समर्थकांना डेरा सोडण्याचे आवाहन ध्वनिक्षेपकाद्वारे केले होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पंचकुला व सिरसा येथे लागू करण्यात आलेली संचारबंदी पाच तासाकरिता हटविण्यात आली होती. त्या काळात काहीही दुर्घटना घडली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस, निमलष्करी दल आणि भारतीय लष्कराच्या तुकड्या संवेदनशील ठिकाणी तळ ठोकून आहेत.

परिस्थिती हाताळण्यासाठी नवा प्लॅन
डेरा सच्चा सौदा मुख्यालयातून हिंसाचार उफळण्याची शक्यता पाहाता, लष्कराने नवीन प्लॅन तयार केला होता. आता मुख्यालयाबाहेर कुणासही येऊ देण्यात मनाई करण्यात येत होती. पुढील 48 तासांच डेरा मुख्यालयात न जाण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. शनिवारी व रविवारी काही डेरासमर्थक गावाच्या दिशेने उघडणार्‍या दरवाजातून बाहेर पडत असल्याचे दिसून आले असून, त्यांची तपासणी करण्यात आली असता, त्यांच्याकडे शस्त्रे आढळून आलीत. त्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे व स्फोटके असल्याचा अंदाज लष्कराने बांधला आहे. सोमवारी शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर हिंसाचाराचा उद्रेक घडविण्याचा डेरासमर्थकांचा इरादा उघड झाला आहे. त्यामुळे लष्कराने डेरा मुख्यालयाच्या नजीकची गावेही सील करण्यास सुरुवात केली होती.