पुणे । महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महिला प्रवाशांना पीएमपी प्रशासनाकडून खास भेट दिली जाणार आहे. या दोन्ही शहरांतील आठ मार्गांवर महिलांसाठी नव्याने 30 बस सोडण्यात येणार असून या बसेसचे ‘तेजस्विनी बस’ असे नामकरण केले जाणार आहे.गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन यापूर्वीच ठराविक मार्गांवर महिलांसाठी विशेष बस सुरू करण्यात आल्या. मात्र, या बसेसला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सध्या केवळ 4 ते 5 मार्गांवरच विशेष बस सुरू आहेत. या बसही केवळ सकाळी व सायंकाळी अशा गर्दीच्यावेळी सोडल्या जातात. गर्दीमध्ये बसमध्ये चढणे, शक्य होत नाही. पर्स, दागिने चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. काही वेळा विनयभंगालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक अडचणींवर मात करून महिलांना प्रवास करावा लागतो.
नवीन मिडी बसच्या दाराजवळ कचराकुंडी
या बसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी 32 खुर्च्यांची व्यवस्था असून चालकाच्या मागील बाजुला सीट बेल्टची व्यवस्था आहे. बसमध्ये पुढे व मागील बाजूस प्रत्येकी एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मागील दरवाजाजवळ कचरा कुंडी आहे. बसमध्ये डिजिटल फलक असून त्यावर प्रत्येक थांब्याची माहिती झळकणार आहे. मार्गावरील बसचे ठिकाण, बसची स्थिती याबाबतची सर्व माहिती ‘आयटीएमएस’ यंत्रणेद्वारे नियंत्रण कक्षात कळणार आहे.
200 अत्याधुनिक मिडी बस होणार दाखल
पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सुरुवातीलाच महिलांना चांगली सेवा देण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार येत्या महिला दिनापासून महिलांसाठी नवीन 30 बस सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पीएमपीच्या ताफ्यात टप्प्याटप्याने 200 अत्याधुनिक मिडी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात येणार्या 30 बसे महिला विशेष म्हणून सोडण्यात येणार असून या बस शहरांतील गर्दीच्या मार्गांवर गरजेनुसार नियमितपणे सोडण्यात येणार आहेत.