गुरुविना प्रगती अशक्य- गोरखे

0

चिंचवड- आयुष्यात गुरुला अतिशय महत्वाचे स्थान असून गुरुविना प्रगती अशक्य आहे. त्यामुळे गुरुंचा नेहमीच आदर ठेवावा, असे मत नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष अमित गोरखे यांनी व्यक्त केले. गोरखे यांच्या हस्ते वर्षभरात विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी गोरखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नॉव्हेल इन्स्टिट्यूट सभागृहात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमाला संस्थेच्या विश्‍वस्त व ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा व नगरसेविका अनुराधा गोरखे, प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. अब्दुल कलाम यांच्या तिसर्‍या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महर्षी व्यास हे शिल्पकार
गुरु पोर्णिमेचे महत्व विषद करताना अमित गोरखे यांनी सांगितले की, गुरुपौर्णिमेला ‘व्यासपौर्णिमा’ असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. त्यांना अभिवादन करण्याचा हा दिवस असतो.
पौर्णिमा म्हणजे प्रकाश असून प्रकाशाची पौर्णिमा साजरी केली जाते. माणसाने आयुष्यात योग्यवेळी गुरु करणे गरजेचे आहे. योग्यवेळी गुरु मिळाल्यास माणसाला आयुष्यात कोणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही. त्यासाठी योग्य वेळी गुरु शोधा असे सांगत गोरखे पुढे म्हणाले, आयुष्यात माणूस कोणत्याही क्षेत्रात पुढे जातो, तो केवळ गुरुंमुळेच त्यामुळे त्यांच्या प्रती नेहमी आदर ठेवणे गरजेचे आहे. दिव्यांग असलेले कृष्णगोपाल तिवारी यांना सनदी अधिकारी (आयएएस) होण्याची इच्छा होती. त्यांना सर्वजण म्हणत होते, की तुम्ही अधिकारी होऊ शकत नाहीत. परंतु, तिवारी यांनी गुरुच्या जोरावर यश पादाक्रांत केले असून आज ते पहिला दिव्यांग जिल्हाधिकारी म्हणून मध्यप्रदेशात कार्यरत आहेत. त्यांचा नुकताच केंद्र सरकारतर्फे गौरव करण्यात आला.

देशाचे दिवंगत तत्कालीन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपतीपदाच्या शपथग्रहण सोहळ्यास त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करण्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यावेळी कलाम यांनी आपल्याला कुटुंब नसून आजपर्यंत इथे पोहचविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, त्या गुरुंना शोधण्यास सांगितले. अधिकार्‍यांनी कलाम यांच्या गुरुंना शोधून शपथग्रहण सोहळ्यास विशेष आमंत्रित म्हणून बोलविले होते, असे उदाहरण गोरखे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांनी गुरुंना कधी विसरु नये, असे आवाहनही त्यांनी केले.