जळगाव : शहरातील वाघ नगर परीसरातील गुरूकृपा कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 73 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी शनिवार, 11 जून रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांसाठी पर्वणी
निलेश अशोक किरंगे (31, गुरूकृपा कॉलनी, वाघ नगर, जळगाव) हे बुधवार 8 जून रोजी रात्री 10 वाजेपासून ते 10 जून रोजी रात्री आठ वाजेदरम्यान बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील लोखंडी कपाटातून दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची चैन आणि चांदीच्या साखळ्या मिळून 73 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. निलेश किरंगे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून शनिवार, 11 जून रोजी दुपारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सतीश हारनोळ करीत आहे.