लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणामुळे भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परीषद शाळांना ‘अघोषित सुटी’ ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ; प्रशासन व शिक्षण विभागात ताळमेळ असण्याची गरज
भुसावळ- आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परीषदेसह नगरपालिका व खाजगी शाळांच्या शिक्षकांसाठी मंगळवारी शहरात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले खरे मात्र सोशल मिडीयावर आलेल्या माहितीनंतर शिक्षकांनी मंगळवारी शाळा नेमकी भरवायची केव्हा? या प्रश्नाबाबत योग्य वेळी शिक्षण विभागाकडून खुलासा न झाल्याने मंगळवारी ग्रामीण भागात अनेक शाळांमध्ये विद्यार्थी फिरकलेच नाहीत तर प्रशिक्षणाला झालेल्या विलंबामुळे शिक्षकांना शाळेवर जाता न आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. ‘गुरूजी प्रशिक्षणाला, दांडी शाळेला’ या वाक्याची प्रचिती आल्याने संतापही व्यक्त झाला. शिक्षण विभाग व प्रशासनाने समन्वय ठेवून प्रशिक्षण ठेवल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल, असा सूर शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सुज्ञ पालकातून व्यक्त होत आहे.
व्हॉटस्अॅपवर प्रशिक्षणाबाबत सूचना
निवडणूक बीएलओंच्या ग्रुपवर गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते यांनी सोमवारी सायंकाळी मंगळवारी भुसावळच्या पांडुरंग टॉकीजमध्ये सकाळी नऊ वाजता निवडणूक प्रशिक्षण होणार असल्याबाबत पत्र टाकले होते तर प्रशिक्षणाला दांडी मारणार्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची तंबीही तहसील प्रशासनाने या पत्रात दिल्याने नगरपालिका शाळांचे तसेच 67 जि.प.शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक तसेच तालुक्यातील खाजगी प्राथमिक शाळांचे शिक्षक मिळून एक हजार 200 वर शिक्षक प्रशिक्षणासाठी हजर झाले. दरम्यान, मंगळवारी प्रशिक्षण असताना मंगळवारच्या शाळेची वेळ काय ठेवायची? याबाबत शिक्षकांनी विचारणा करूनही सायंकाळपर्यंत शिक्षण विभागाकडून व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये उत्तर देण्यात न आल्याने मंगळवारी अनेक शाळा विद्यार्थी व शिक्षकांअभावी ओस पडल्याचे चित्र होते.
व्हीव्हीपॅट मशीनबद्दल प्रशिक्षण
एकीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जवाबदारी तर दुसरीकडे राष्ट्रीय कर्तव्याला प्रायोरीटी अशा दुहेरी मनस्थितीत असलेले शिक्षक सकाळी नऊ वाजेपूर्वीच पांडुरंग टॉकीजमध्ये हजर झाले. सकाळी 9 ते 10.30 दरम्यान पांडुरंग टॉकीजमध्ये प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, प्रभारी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, निवडणूक नायब तहसीलदार विजय भालेराव, नायब तहसीलदार सतीश निकम, योगेश मुस्कवाड आदींच्या उपस्थितीत व्हीव्हीपॅटबद्दल माहिती देण्यात आली तसेच नागरीकांच्या शंका-कुशंकांना कशा पद्धत्तीने उत्तरे द्यावयाची याबाबतही सांगण्यात आले त्यानंतर
12 ते 5 वेळात तहसीलमध्ये प्रत्येकी 50 शिक्षकांच्या समुहाला प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी व्हीव्हीपॅट मशीनच्या हाताळणीची माहिती दिली.
नुकसानीस जवाबदार कोण?
सकाळी नऊ ते पाच या वेळेत चाललेल्या प्रशिक्षणामुळे अनेक शिक्षकांना ग्रामीण भागातील शाळांवर पोहोचता आले नाही तर काही शिक्षकांनी गावावर दूरध्वनी करून विद्यार्थ्यांना दुपारून उपस्थितीचे आवाहनही केले मात्र शिक्षण विभाग व प्रशासनाच्या ताळमेळअभावी विद्यार्थ्यांना मात्र एका दिवसासाठी शिक्षणापासून मुकावे लागल्याची वेळ आली.
समन्वय साधण्याची गरज -गणेश फेगडे
तहसील प्रशासन व शिक्षण विभागाने समन्वय साधून बैठकीचे नियोजन केले असते तर शिक्षकांची व विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली नसती, असे शिक्षक परीषदेचे भुसावळ तालुकाध्यक्ष गणेश फेगडे म्हणाले.
प्रशिक्षणाला न येणार्यांवर गुन्हे -प्रांताधिकारी
प्रशासनाकडे तीन व्हीव्हीपॅट मशीन असून बॅचेस ठरवून देण्यात आल्या आहेत जे या प्रशिक्षणाला येणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, असे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर म्हणाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना सूचना देवूही, असेही ते म्हणाले.