Gang of cattle thieves in Malegaon along with Dhule, Jalgaon in LCB’s net जळगाव : जिल्ह्यातून गुरे लांबवणार्या टोळीच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी जिल्ह्यातील तब्बल 19 गुन्हे केल्याची कबुली दिली असून अटकेतील आरोपी जळगावसह धुळे व मालेगावातील रहिवासी आहेत. तीन संशयीत आरोपींना अजिंठा चौक परीसरातून दोन चारचाकींसह अटक करण्यात आल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शुक्रवार, 16 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार परीषदेत दिली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून गेल्या काही दिवसांपासून गुरांची चोरी होत असल्याबाबत अनेक गुन्हे दाखल होत होत. गुरे चोरणार्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या सुचना पोलिस अधीक्षकांनी दिल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला माहिती मिळाली. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील मोहंमद फयाज मोहंमद अयाज हा अजिंठा चौकात स्कॉर्पीओ कार क्रमांक (एम.एच12 बी.व्ही.9415) सह आल्याची माहिती मिळताच त्यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीने अन्य साथीदारांच्या मदतीने गुरे चोरी केल्याची कबुली दिली. यात वसीम मोहमंद अस्लम कुरेशी आणि नईम शेख कलीम (दोन्ही रा. मासुमवाडी, जळगाव) यांनादेखील अटक करण्यात आली तर गुरे चोरणार्या टोळीत जाफर गुलाब नबी (कसाईवाडी, पाळधी, ता.धरणगाव), हारून उर्फ बाली शहा (बारापथ्थरजवळ, धुळे), मनोज उर्फ मोन्या विठ्ठल पाटील (सुरेशनगर, कुसुंबा, ता.जळगाव) यांचाही सहभाग असल्याची कबुली आरोपींनी दिल्याने त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
तब्बल 19 गुन्ह्यांची उकल
आरोपींनी जामनेर पोलिस ठाणे हद्दीत एक भडगाव- 2, अमळनेर- 3, एरंडोल- 2, पारोळा- 2, चोपडा- 1, जळगाव तालुका-3, मुक्ताईनगर- 4, पाचोरा-1 असे एकूण 19 गुन्हे केल्याची कबुली दिली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.