भुसावळ विभागात शाळा प्रवेशाची वाजली घंटा ; गणवेशाची मात्र प्रतीक्षाच
भुसावळ- 45 दिवसांच्या उन्हाळी सुटीनंतर शुक्रवारी जिल्हा परीषद प्राथमिक शाळांची घंटा वाजली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसलेतरी गुलाबपुष्प व नव्या कोर्या पुस्तकांची भेट मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. शिक्षक मतदार संघातील आचारसंहितेच्या बडग्यामुळे लोकप्रतिनिधींना दूर सारत मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले तर अनेक ठिकाणी प्रभातफेरी काढण्यात आली तसेच शाळांमध्ये सनईचे मंगल स्वरही कानी पडले. काही विषयांची पुस्तके विद्यार्थ्यांना प्राप्त झाली नसल्याचेही सांगण्यात आले तर शनिवारी रमजान ईद व रविवारी लागून सुटी आल्याने विद्यार्थ्यांनी दांडीदेखील मारली मात्र सोमवारपासून शाळा नियमित सुरू होणार आहे.
साकळीत शाळा प्रवेशोत्सव
यावल- तालुक्यातील साकळी शिवाजी मित्र मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय शिरसाड-साकळी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी ’प्रवेशोत्सव व पुस्तक वाटप’ कार्यक्रम झाला. प्रवेशोत्सवानिमित्त शाळा व वर्ग सुशोभित करण्यात आले. आंब्याचे तोरण व रांगोळ्यांनी परिसर सजविण्यात आला. त्यानंतर गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. साक्षर जनता, भूषण भारता,अक्षर कळे , संकट टळे आपल्या मुलांना शाळेत पाठवा या सारख्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर शाळेत इयत्ता पाचवीत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व पुस्तक वाटप करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक के.एल.बडगुजर यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले.ि वद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या अनंत शिंदे यांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले व पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर शालेय पोषण आहारासोबत जिलेबी देवून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले. मुख्याध्यापिका शिंदे यांनी ’शालेय शिस्त व गुणवत्ता’यावर आपले मनोगत मांडले. सूत्रसंचालन शुभदा नेवे यांनी तर आभार प्रदर्शन निंभोरे यांनी मानले.
गोडधोड पदार्थांनी रावेर तालुक्यात विद्यार्थ्यांचे स्वागत
रावेर- प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव दिन साजरा झाला. प्रभात फेरी, विद्यार्थ्यांची घोडा गाडीतून मिरवणूक, नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, गोड खावू वाटप, मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. जिल्हा मार्गदर्शन संस्थेचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, शिक्षण विभाग जळगावचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विवेक महाजनी, गट शिक्षणाधिकारी विजय पवार, शालेय पोषण आहार अधीक्षक अजित तडवी यांच्यासह विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख , विषयतज्ञ यांनी शाळांना भेटी देवून मार्गदर्शन केले. एकही मूल शाळाबाह्य राहू नये यासाठी शिक्षकांनी पालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घ्यावेत अशा सूचना शिक्षण विभागाने केलेल्या आहेत.
द.शि. विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव
भुसावळ – येथील द. शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी नवप्रवेशित बालकांचे स्वागत करण्यात आले. त्यांना मुख्याध्यापक जे.बी. राणे यांनी पुष्पगुच्छ व खाऊ वाटप केला. शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मधल्या सुट्टीत शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थ देण्यात आले. पर्यवेक्षक के. डी. पाटील यांनी सोमवारपासून नियोजित वेळेप्रमाणे शाळा भरणार असल्याने नियमित शाळेत हजर राहण्याचे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसह विद्यार्थी उपस्थित होते.
न. पा. शाळा क्रमांक एकमध्ये बालकांचे स्वागत
भुसावळ – नगरपरीषद संचलित शाळा क्रमांक एकमध्ये नवागतांचे शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक साधना महाजन यांनी बालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व खाऊ वाटप केला. खिलचंद पाटील व मनिषा तायडे यांनी सोमवारपासून नियोजित वेळेप्रमाणे शाळा भरणार असल्याने नियमित शाळेत हजर राहण्याचे आवाहन केले. प्रसंगी डॉ.जगदीश पाटील यांनी बालभारती व मुक्त विद्यालय अभ्यास मंडळात काम केल्याबद्दल त्यांचा मुख्याध्यापक साधना महाजन, खिलचंद पाटील व मनिषा तायडे यांनी पुष्पगुच्छ देऊन न.प. संचलित शाळा क्रमांक 1 तर्फे सत्कार केला. यावेळी द. शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक जे.बी. राणे, पर्यवेक्षक के. डी. पाटील, जेष्ठ शिक्षक डी.पी. ढाके, ललितकुमार फिरके यांच्यासह बालक व पालक उपस्थित होते.
देशभक्तीपर गीतांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
भुसावळ-महाराणा प्रताप विद्यालयात शुक्रवारी प्रभात फेरीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी शिक्षण,साक्षरता इत्यादी विषयांवरील घोषणा देवून शाळा व शिक्षण या संदर्भात जनजागृती निर्माण केली. प्रभात फेरी शाळेत आल्यावर मुख्याध्यापक प्रकाश चौधरी व पर्यवेक्षीका मोरे यांनी गुलाबपुष्प देवून व विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यानंतर प्रार्थना, प्रतिज्ञा, राष्ट्रगीत होवून मुख्याध्यापक प्रकाश चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. यावेळी मुख्याध्यापक चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वंदना ठोके तर शिक्षक पंकज साखरे यांनी देशभक्तीपर गीते सादर करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.