धरणगाव । तालुक्यात शिवसेनेचे मातब्बर नेते महाराष्ट्र राज्याचे सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील हे दोन्ही दिग्गज नेते आहे. हे दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असल्याचे संपुर्ण जिल्ह्याला ज्ञात आहे. 2010 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युती असतांना गुलाबराव पाटील यांना पराभूत करण्यासाठी पी.सी.पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना मदत करुन गुलाबरावांना पराभूत केल्याचे सांगितले जाते. या दोन्ही नेत्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहे. धरणागाव तालुक्यातील चावलखेडा येथील नीळकंठेश्वर शिक्षण संस्थेत गुलाबराव पाटील व पी.सी.पाटील हे दोन गट कार्यरत आहे. या गटातील वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.
दोन्ही गटाकडून कार्यक्रमाचे आयोजन
दुसर्या गटातील अध्यक्ष दगा पाटील यांनी 1 जुलै रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ व राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन संस्थेत केले होते. तर पहिल्या गटाचे अध्यक्ष पी.सी. पाटील यांनीही 1 रोजीच संस्थेत कार्यक्रम आयोजित केला होता. दोन्ही नेत्यांमध्ये आधीपासूनच वाद आहेत. त्यात आणखी भर पडू नये, म्हणून प्रशासनाने शनिवारी जमावबंदी आदेश लागू केला. त्यामुळे नाईलाज झालेल्या दोन्ही गटांनी वाघळूद येथील दोन मंदिरांवर दोन वेगवेगळे कार्यक्रम घेतले. संस्थेच्या परिसरात दंगा नियंत्रक पथक तैनात होते.
चालवखेड्यात जमावबंदी
चावलखेडा येथील निळकंठेश्वर शिक्षण संस्था सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याने संस्थेचा सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. दोन्ही गटातील वाद चव्हाट्यावर आल्याने सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभाच्या पाश्वभूमीवर प्रशासनाला जमावबंदी आदेश लागू करावा लागला. या प्रकारामुळे राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील यांच्यातील वादाने गंभीर वळण घेतल्याचे बोलले जात आहे.