कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली, तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचारदेखील त्या त्या ठरावीक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, कार्य मात्र त्याला अपवाद आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते.
सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), जनता (1930) आणि प्रबुद्ध भारत (1956) अशी वृत्तपत्रे चालवली. या काळात जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती, त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे (तत्कालीन) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषगांने त्यांनी त्यातून लिखाण केले. केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी दी अनटचेबल्स, शूद्र पूर्वीचे कोण होते?, बुद्धा अँड हिज धम्म, असे ग्रंथ लिहिले. याशिवाय थॉट्स ऑन पाकिस्तान हा जागतिक राजकारणावरील ग्रंथदेखील लिहिला. साहित्याला त्यांनी मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच वापरले नाही. उत्तम समाज समीक्षक असण्याबरोबरच स्वत: एक वाङ्मय-समीक्षक असणार्या डॉ. आंबेडकरांनी संत तुकाराम, संत मुक्तेश्वर यांच्या भाषेचा गौरव केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या खरा ब्राम्हण, यशवंत टिपणीस यांच्या दख्खनचा दिवा या नाटकांवरदेखील त्यांनी विस्तृत स्वरूपात अभिप्राय दिलेले आहेत. बट्रेन्ड रसेल यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन या नाटकावर त्यांनी आपले मत नोंदवले आहे. रिडल्स इन हिंदूइझम, महाराष्ट्र अॅ ज अ लिंग्विस्टिक स्टेट, स्टेट्स अँड मायनॉरिटिज, भारतातील जाती या ग्रंथांचीही त्यांनी निर्मिती केली. डॉ. आंबेडकर यांच्यावर संत कबीर, महात्मा जोतिराव फुले व राजर्षी शाहू महाराज या व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या विचारांचा व कार्याचा मोठा प्रभाव होता. डॉ. आंबेडकर हे कर्ते सुधारक होते.
सर्व माणसे समान आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा होती. जातीय उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था, या व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार यांबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. जेव्हा लंडनहून भारतात परत आले, तेव्हा परिचित लोकांनी, बाबासाहेबांनी मोटारीने घरी जावे असा आग्रह धरला. पण रेल्वेच्या तिसर्या वर्गातून प्रवास केला. जेव्हा ते घरी गेले, तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची आणण्यासाठी धावपळ सुरू केली. पण इथेही बाबासाहेबांनी घरातील घोंगडीवर बसणेच पसंत केले. या कृतीतून त्यांनी समानतेचे तत्त्व बिंबवले. स्वत: डॉ. आंबेडकर जरी हिंदू देवी-देवतांना मानत नव्हते, तरीही त्यांनी 1930 ला नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरू केला. कारण जर मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला, तर त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न सुटण्यास हातभार लागेल, असे त्यांचे मत होते. तो लढा तत्कालीन अस्पृश्यांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मानवी हक्कांसाठी होता. यासाठी त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करणार्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीर दहनही केले. 1917 ते 1935 या काळात हिंदू धर्मात राहूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न केला. 1935मध्ये त्यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा येवला येथे केली. 1956 मध्ये सुमारे पाच लाख अस्पृश्य बांधवांसह बौध्द धर्माची दीक्षा घेऊन डॉ. आंबेडकरांनी धर्म-परिवर्तनाची घोषणा प्रत्यक्षात आणली. (दिनांक 14 ऑक्टोबर, 1956., नागपूर.)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातीव्यवस्थेविरोधातच लढत होते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण, अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती, अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्द्यांकडेही त्यांचे अवधान होते. एकीकडे ते जसे 1930 ते 32 मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांतून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढतात .भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांचे कैवारी म्हणूनच. पण त्यांचे कर्तृत्व इतपतच मर्यादित नाही. भारतीय स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी बदल आणू पाहणार्या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची म्हणावी तशी दखल आपल्या भगिनीवर्गाने घेतलेली नाही. भारतीय परंपरेने स्त्रीला कायमच जोखडात ठेवले आहे. तिने बालपणी पित्याच्या, तरुणपणी पतीच्या आणि म्हातारपणी पुत्राच्या अधिपत्त्याखाली राहावे, अशी व्यवस्था पुरुषसत्ताक समाजाने करून ठेवली. स्त्रियांचा समग्र विकास आणि उत्थानाचा जाहीरनामा डॉ. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातून सादर केला. त्या वेळी बाबासाहेब भारताचे कायदेमंत्री होते. भारतीय स्त्रियांच्या हक्कांसाठी केवढा मोठा त्याग बाबासाहेबांनी केला!
1955-56 मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे म्हणजे 1) हिंदू विवाह कायदा, 2) हिंदू वारसाहक्क कायदा, 3) हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा आणि 4) हिंदू दत्तक व पोटगी कायदा. हे कायदे मंजूर होणे म्हणजे कायद्याच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होय. 1930 सालच्या गोलमेज परिषदेच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असा सल्ला दिला होता. आपल्या पी.एचडी. च्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विश्लेषण केले होते. विभक्त मतदारसंघांच्या प्रश्नावरून जेव्हा महात्मा गांधींनी आमरण उपोषण सुरू केले, तेव्हा डॉ.आंबेडकर यांच्यासमोर महात्मा गांधींचे प्राण महत्त्वाचे की आपल्या जातिबांधवांचे हित महत्त्वाचे असा प्रश्न उभा राहिला. शेवटी त्यांनी तडजोड स्वीकारून महात्मा गांधीजींना आमरण उपोषण मागे घ्यायला लावले व त्याच वेळी अस्पृश्यांसाठी वेगळ्या रीतीने राखीव मतदारसंघ निर्माण करून आपल्या जातीबांधवांचे हितदेखील पाहिले (पुणे करार). जेव्हा त्यांनी धर्मांतर करायचे ठरवले, तेव्हा सखोल अभ्यास व चिंतन करून त्यांनी अहिंसा, सत्य, मानवता यांना प्राधान्य देणारा बौद्ध धर्म निवडला. त्यांनी मुंबई येथे1946 मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाची, तर औरंगाबाद येथे 1950 मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याशिवाय त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थांचीदेखील स्थापना केली. शिक्षणाबरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रातही 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली.1927 ला सवर्णांच्या अन्याय व अत्याचारापासून पददलितांचे संरक्षण करावे या हेतूने शिस्तबद्ध असे समता सैनिक दल स्थापन केले. 1936 साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, तर 1942 साली अखिल भारतीय स्केड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. डॉ. आंबेडकरांना भारतीय कृषी व्यवस्थेचीदेखील चांगली जाण होती. सामूहिक शेतीचे ते पुरस्कर्ते होते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात पाणी आणि वीज यांचा समानरीत्या पुरवठा झाला, तर भारत एक समृद्ध देश होण्यास वेळ लागणार नाही असे त्यांचे मत होते. पूर्वीच्या काळी असलेल्या खोती पद्धतीमुळे शेतकरी वर्गावर खूप अन्याय होत असे. ही खोती पद्धत नष्ट करणारे कायदे डॉ. आंबेडकरांनी केले. ज्याप्रमाणे रेल्वेमार्गावर पूर्णपणे केंद्र शासनाची मालकी असते, त्याप्रमाणे जलमार्गावरदेखील केंद्र शासनाचीच मालकी असावी असे मत त्यांनी मांडले. पण हे मत कोणी फारसे विचारात घेतले नाही. त्यामुळे त्याचे आज काय परिणाम झालेले आहेत ते सर्वश्रुत आहे. आज भारतात जी नदीजोड प्रकल्पाविषयी चर्चा चालू आहे, त्या नदीजोड प्रकल्पाची एक योजनादेखील त्यांनी फार आधीच मांडली होती.
1947 मध्ये डॉ.आंबेडकरांचा स्वतंत्र भारताचे कायदामंत्री म्हणून पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाला व त्याच वर्षी त्यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी व घटना समितीचे सभासद म्हणून निवड झाली. यावरून डॉ. आंबेडकरांच्या द्रष्टेपणाची, बुद्धिमत्तेची कल्पना आपल्याला येते. इतर पाश्चात्त्य देशात स्त्रियांना व गरिबांना मतदानाचा अधिकार फार उशिरा मिळाला. पण डॉ. आंबेडकरांनी प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार देशाला स्वतंत्र झाल्यापासूनच करायला लावला व भारतीय लोकशाहीचा पायाच त्यांनी या प्रकारे भक्कम केला. प्रशासकीय अधिकार्यांना त्यांचे कार्य नीट करता यावे यासाठी त्यांच्या सेवा-शर्ती, नेमणूक याबाबत राज्यघटनेतच तरतूद करून त्यांना डॉ. आंबेडकरांनी निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्योद्धारक असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर, 1956 ला हे जग सोडून गेले. अद्वितीय बुद्धिमत्ता, त्याआधारे स्वत: घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण; जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य; शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा; वक्तृत्व; इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व; प्रचंड वाचन; संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन,अशा अनेक गुणविशेषांसह भीमजी रामजी आंबेडकर यांचा प्रवास हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे प्रज्ञावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथपर्यंत झाला.
– अशफाक पिंजारी, जळगाव
9823378611