चियांग राय –थायलंडमधील चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत बेपत्ता झालेल्या फुटबॉल संघाचा अखेर नऊ दिवसांनी शोध लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून थाय फुटबॉल संघांतली जवळपास ११ ते १६ वयोगटातील एकूण १२ मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक या गुहेत अडकले होते. या संघाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू होते. अखेर ९ दिवसांनी या संघाला शोधण्यात यश आले असून सुदैवाने सगळे सुखरूप आहेत. मात्र त्यांच्यापुढील संकट अजूनही संपले नाही, कारण गुहेतून बाहेर काढण्यासाठी कदाचित एक आठवडा किंवा महिनाभराचा अवधी आणखी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही गुहा थायलंडमधली चौथ्या क्रमांकाची मोठी गुहा आहे. मात्र गुहेत सध्या पाणी शिरल्यानं बचावकार्यात अडथळे येत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत या परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पावसामुळे गुहेतील पाण्याची पातळी वाढत जाईन आणि या मुलांना गुहेबाहेर काढण्यात अडचणी येतील असं म्हटलं जात आहे. तेरा जणांच्या ब्रिटीश पाणबुड्यांच्या टीमनं सोमवारी (२ जुलै) रात्री १० वाजता या मुलांना शोधलं. हा संघ गुहेत खूपच आत अडकला आहे. पाण्यामुळे गुहेत चिखलही मोठ्या प्रमाणात झाला आहे. या संघाला खाण्याची रसद पोहोचवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही औषधं देखील त्यांना देण्यात आली आहे. चार महिने पुरेल इतकी रसद त्यांना पुरवण्यात आली आहे.
या मुलांच्या सुटकेसाठी थाय नौदल आणि थाय हवाई दल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे मात्र पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत होते. ठिकाठिकाणी चिखल आणि पाणी साचलं आहे. त्यामुळे या मुलांना गुहेबाहेर काढण्याचे दोनच पर्याय बचाव पथकाकडे आहेत. गुहेत साचलेल्या पाण्यातून पोहून ही लहान मुलं गुहेतून बाहेर येऊ शकतात. मात्र यातल्या एकाही मुलाला पोहता येत नसल्यानं पाणबुड्यांना त्यांना आधी प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. पावसामुळे गुहेतील पाण्याची पातळी वाढत गेली तर मात्र मुलांना पोहण्यात अडथळे येऊ शकतात. सध्या या गुहेतील पाणी बाहेर काढण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे.
ही गुहा वरून खोदून त्यानंतर या मुलांना बाहेर काढलं जाऊ शकतं मात्र दोन्ही पर्यायापैकी एका पर्यायाचा विचार केला तरी या मुलांना आणखी काही दिवस इथे राहावं लागणार आहे. ‘या मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्याचे आम्ही ठरवले आहे. तूर्त चार महिने उरेल एवढी रसद या मुलांना देण्यात आली आहे. अशी माहिती नौदलाचे कॅप्टन आनंद सुरावन यांनी एएफशी बोलताना दिली आहे. दररोज पाऊस पडत असल्यानं ही मोहीम खूपच कठीण आहे. पण या मुलांना वाचवायचा आमचा निर्धार पक्का आहे, पण आमच्यासमोर निसर्गाचं मोठं आव्हान असणार आहे, असं चियांग रायचे गर्व्हनर म्हणाले. त्यामुळे ही मुलं लवकरात लवकर सुखरुप गुहेबाहेर यावीत यासाठी जगभरातून प्रार्थना केल्या जात आहेत.