नवी दिल्ली : नवीन वर्षात गृहिणींना लवकरच गूड न्यूज मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी केंद्र सरकारच्या सूचनेवरून घरगुती व व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा लवकरच केली जाणार आहे. साधारणतः साडेचार रुपयांनी सिलिंडर स्वस्त झाले आहे. परंतु, सबसिडीच्या रकमेत कपात झाल्याने ही दरकपात तूर्त दिसत नाही. जानेवारीत मात्र आणखी दरकपात च हे दर लागू होतील. तसेच, यापुढेही आणखी दरकपात केली जाणार असल्याची माहिती कंपन्यांनी दिली आहे.
साडेचार रुपयाने सिलिंडरच्या दरात कपात
तेल कंपन्यांनी नव्या वर्षात गॅस सिलिंडरच्या दरात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जानेवारीत सिलिंडरच्या दरात साडेचार रुपयाने दरकपात करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने याबाबत तेल कंपन्यांना सूचना केली होती. सिलिंडरचे दर सातत्याने वाढत असल्याने केंद्र सरकारवर चोहीकडून टीका होत असून, त्याची दखल घेत केंद्र सरकारने तेल कंपन्यांना दरकपातीचा सल्ला दिला होता. त्यानुसार, जानेवारीत साडेचार रुपयाने दरकपात करत आणखीही दरकपातीचे संकेत तेल कंपन्यांनी दिली आहे. 14.20 किलोच्या सिलिंडरचे दर सद्या 822.50 रुपयांवरून 818 रुपये करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर 1451 वरुन 1447 रुपये करण्यात आलेले आहेत.
विनाअनुदानीत सिलिंडरचे दर घटले
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गॅस सिलिंडरवरील सबसिडी सोडण्याची विनंती नागरिकांना केली होती. परंतु, त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. जानेवारीत प्रतिसिलिंडर सबसिडी ही 320 रुपये मिळणार आहे. गतवर्षीपेक्षा सबसिडीच्या रकमेत सरकारने घट केली आहे. डिसेंबर 2017 मध्ये ही रक्कम 325.61 रुपये इतकी होती. म्हणजेच, सबसिडीत 4.61 रुपये घट करण्यात आली आहे. त्यामुळे साडेचार रुपये किमत कमी होऊनही गृहिणींना घरगुती वापराचे सिलिंडर तेवढ्याच किमतीत विकत घ्यावे लागत आहे. जे ग्राहक सबसिडीचे सिलिंडर घेत नाहीत त्याच ग्राहकांना तूर्त तरी सिलिंडरचे दर कमी झाल्याचा फायदा होणार आहे. नवीन वर्षात यापुढे होणार्या दरकपातीचा फायदा मात्र गृहिणींना होऊ शकतो, असेही तेल कंपन्यांनी सांगितले आहे.