गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांचे आणखी एक प्रकरण उघड!

0

मुंबई । गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असून विधानसभेत सलग तिसर्‍या दिवशी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी जोरदार गोंधळ केला. शुक्रवारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत मेहतांचे नवे भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणले. सांताक्रूझ इथला एक भूखंड केंद्रीय समितीत सदस्य असलेल्या एका विकासकाला प्रकाश महेता यांनी बेकायदेशीर रित्या मिळवून दिल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची आणि चौकशीची मागणी करत गदारोळ केला.

सुरुवातीपासूनच मेहतांवरून गोंधळ
विखे पाटील यांनी मेहतांचे सांताक्रूझ येथील प्रकरण सभागृहासमोर ठेवून या मंत्र्यांचे रोज प्रकरण समोर येऊनही कारवाई का केली जात नाही? असा सवाल केला. संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी प्रश्नोत्तरानंतर चर्चा करुन सांगत, मुख्यमंत्र्यांनी समिती नेमण्याचे सांगितले असून त्यातही विरोधकांना बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे सांगितले. यावर आक्षेप घेत अजित पवार यांनी मुख्यमंत्री केवळ समिती नेमून कारवाई करू म्हणतात मात्र कोणती समिती? त्यात कोण असेल? याबाबत काहीही कल्पना दिली जात नसल्याचे सांगत मंत्र्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप केला.

विखे पाटलांचे आरोप
विखे पाटील यांनी यावेळी मेहता यांच्यावर आरोप करताना त्यांच्या पत्नीसह मुलांचाही गैरव्यवहारात संबंध असल्याचे सांगितले. त्यांच्या पत्नीच्या विरोधात एफआयआर केल्यावर त्यांनी पत्नीचे नाव बदलले असल्याचे देखील विखे पाटील यांनी सांगितले. महेतांच्या विरोधात सगळे कागदपत्रे आहेत मग त्यांना का वाचवता? असाही आरोप विखे पाटील यांनी केला. यावेळी प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेल्याने विरोधक घोषणाबाजी करत वेलमध्ये उतरले. बॅनर घेऊन सदस्य वेलमध्ये घोषणाबाजी करत होते.

सत्तार यांच्यावर आरोप
एखाद्या सदस्यांवर मानहानीचे आरोप करण्याआधी नियम 35 तालिकाध्यक्ष सांगत असताना काँग्रेसचे सदस्य अब्दुल सत्तार मध्येच बोलले. मध्ये बोलने योग्य नाही असे म्हटल्यावर सत्तार यांनी काय करणार? असा सवाल केला. यावर अध्यक्षांनी संतापुन काय करायचं ते करू असे म्हटले. विरोधी पक्ष आक्रमक होत वेलमध्ये उतरले. यावेळी तावडे यांनी हा अध्यक्षांचा आणि सभागृहाचा अवमान असल्याचे सांगत सत्तार यांनी अध्यक्षांना धमकी दिल्याचा आरोप केला.