गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता ते मोपलवार

0

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी करण्याची घोषणा अखेर मुख्यमंत्र्यांना विधानसभेत करावी लागली. प्रकाश मेहता ताडदेव येथील एमपी मिल्स कम्पाउंडमधील बिल्डरला उपकृत केल्यामुळे या बिल्डरला सुमारे 800 कोटींचा फायदा झाल्याचा आरोप विधानसभेत काँगे्रस आणि राष्ट्रवादीने केल्याने एकच खळबळ माजली.

मेहता यांच्या कारभाराबाबत मुख्यमंत्री सुरुवातीपासूनच नाराज आहेत. या खात्याच्या मंत्र्याकडून पक्षाला खूप अपेक्षा होत्या. पण या मेहता महाशयांनी बिल्डरांचे हित जपण्याकडे अधिक लक्ष दिले.1995-99 या युती सरकारच्या काळात मेहता राज्यमंत्री होते. मंत्रिपदाचा अनुभव असल्याने गृहनिर्माण या लोकांशी संबंधित खात्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली. राज्यात परवडणार्‍या घरांचा प्रश्‍न जटिल आहे, पण यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांनी काय प्रयत्न केले, किती बैठका घेतल्या? हेसुद्धा त्यांनी आता जाहीरपणे सांगायला हवे.

या प्रकरणात प्रकाश मेहता यांनी 70,000 फूट चटई निर्देशांक दिल्याने अधिक भुवया उंचावल्या गेल्या. अशा मोठ्या निर्णयासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते, पण या मंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांनी अवगत केले, असा फाइलवर शेरा मारून कळसच केला. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याची चौकशी विधानसभेत घोषित करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येणे ही सत्ताधार्‍यांची नामुष्की आहे. मेहता यांच्याबाबत भयंकर तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे आल्या होत्या, पण सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. पण या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांना मेहता यांनी गोवल्याने ते संतापले आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी मेहता महाशयाना सुनावले होते की तुम्हीही मातीत जाल आणि मलाही मातीत घालाल.

मेहता हे थेट अमित शहा यांचे उमेदवार आहेत, अशी चर्चा त्यांचे समर्थक करत होते, पण त्यात काही तथ्य नाही. ते अमित शहा यांचे उमेदवार असते, तर हे प्रकरण विधानसभेत आले नसते. मेहता यांची या प्रकरणातील अनियमितता स्पष्ट झाली आहे. एकनाथ खडसे यांच्यानंतर आता प्रकाश मेहता यांची विकेट निश्‍चित मानली जात आहे. खडसे यांच्यासारखी राजीनामा देण्याची वेळ मेहता यांच्यावर येणार नाही अशी शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनानंतर विस्तारात त्यांना वगळले जाईल.

मोपलवार यांचे कारनामे विधीमंडळात रस्तेविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांचे कारनामे विधीमंडळात पृथ्वीराज चव्हाण आणि धनंजय मुंडे यांनी उघडकीस आणले आहेत. मोपलवार हे समृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी आहेत. जमिनीचे बेकायदा वाटप आणि कोट्यवधी रुपयांची लाच स्वीकारण्याबाबत मोपलवार मध्यस्थाशी चर्चा करत असल्याची ऑडिओ क्लिप कालपासून माध्यमांमध्ये फिरत आहे. या संभाषणात मोपालवारांना मंत्रालयात कोट्यवधी रुपये द्यावे लागतील, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे या संभाषणातील गांभीर्य वाढले आहे. मंत्रालयात कोण पैसे घेतो, असा सवाल विरोधक करत आहेत.

मोपलवार यांच्या संभाषणातील कल्पतरू आणि लोढा कोण, असा सवाल विरोधकांनी केला आहे. मोपलवार यांची तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मोपलवार यांचा इतिहास पाहता या क्लिपमध्ये तथ्य असावे. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त असताना त्यांनी अनेक उद्योग केले त्याची एसीबीमार्फत चौकशी केली तर अनेक गोष्टी समोर येतील. त्यांना पदावरून हटवून विरोधकांनी गप्प बसू नये, तर सीबीआय चौकशी मागावी. मोपलवार यांना मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याचा आशीर्वाद आहे. या अधिकार्‍याच्या मेहुण्याने समृद्धी महामार्गात जमिनी विकत घेतल्या आहेत. या सरकारी पाहुण्याची मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून झाडाझडती घ्यायला हवी. आज मुख्यमंत्र्यांनी आपली इमेज जपली आहे. विरोधकांना अजूनपर्यंत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप करता आले नाही. परंतु, या अधिकार्‍याचे मुख्यमंत्री का लाड करत आहेत? हा प्रश्‍न सर्वांना पडत आहे. भ्रष्ट अधिकार्‍याला आणि त्याच्या नातेवाइकांना पाठीशी घालणे हा अप्रत्यक्ष भ्रष्टाचारच आहे. या अधिकार्‍यावर शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्यातील आमदारांनी आरोपही केले होते, पण नंतर हे प्रकरण थंडावले. या आमदारांच्या नेत्याने या अधिकार्‍याशी सेटलमेंट केले. मोपलवार यांची चौकशी झाली की सर्व गोष्टी समोर येतील. मुख्यमंत्र्यांनी मोपलवार हे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाईचे आश्‍वासन दिले आहे, पण आपल्या कार्यालयातील या अधिकार्‍याला मुख्यमंत्री हात लावतील का?
नितीन सावंत – 9892514124